पुणे : महापालिकेच्या वतीने लवकरच विविध पदांसाठी ५०० जागांवर भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यात लिपिक पदापासून कनिष्ठ अभियंता, सहायक अतिक्रमण निरीक्षक यासह अग्निशमन विभागातील १०० जागांचाही समावेश असणार आहे.
या भरतीसाठी रोस्टरचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच जाहिरात निघेल. ही पदभरती आयबीपीएस या संस्थेकडून करून घेतली जाणार आहे. त्यासाठी करार केला आहे. पदभरतीत पारदर्शकता राहावी आणि कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
महापालिकेत कनिष्ठ अभियंता आणि लिपिकांसह सहायक अतिक्रमण निरीक्षक, सहायक विधि अधिकारी, अग्निशामक दलासाठीचे कर्मचारी यांचीही भरती केली जाणार आहे. ही भरतीप्रक्रिया पारदर्शी असावी यासाठी महापालिकेने केंद्र शासनाच्या ‘आयबीपीएस’ संस्थेद्वारे परीक्षा घेण्यासाठी करार करण्यात आला आहे. पदभरतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता गृहीत धरून ही परीक्षा केवळ पुण्यात घेणे शक्य नाही. त्यामुळे मुंबई, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर यासह इतर शहरांमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन केले जाणार आहे.