इंट्रो -
कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या लाखो तरुणांसमोर नोकरीचा प्रश्न उभा राहणे साहजिक आहे. या तिन्ही शाखांमध्ये शिक्षण घेऊन आधुनिक काळातील विविध कौशल्य असणाऱ्या तरुणांना नोकरीच्या संधी आहेत. त्यासाठी कष्ट, चिकाटी, संवाद कौशल्य, सादरीकरण, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची क्षमता हे गुण आवश्यक आहेत. या कौशल्यांच्या आधारेच खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातही नोकरी मिळवणे कठीण नाही.
देशात २०१४ पासून बेरोजगारांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. एका बाजूला तरुण शिक्षण घेऊन बाहेर पडत आहे. तर दुसऱ्या बाजूला या शिक्षित तरुणांना सामावून घेण्यात अर्थव्यवस्था अपयशी ठरत आहे. सार्वजनिक आणि खासगी दोन्ही क्षेत्रातही रोजगाराच्या संधी कमीच आहेत. मात्र, अशा बदलत्या परिस्थितीत विविध कौशल्य असणाऱ्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
पुण्यातील करिअर समुपदेशक दीपक शिकारपूर म्हणाले की, सध्या बेरोजगारी वाढली आहे हे खरे आहे. मात्र, नोकऱ्याच नाहीत असे म्हणता येणार नाही. विविध कौशल्ये आत्मसात करणाऱ्या तरुणांसाठी नोकऱ्या आहेत. कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मात्र, माहिती तंत्रज्ञान (आयटी), वैद्यकीय, औषधनिर्मिती आणि वाहननिर्मिती क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध आहेत. वाहनविक्री वाढल्यामुळे वाहननिर्मिती क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. आयटी क्षेत्रात कॅपजेमिनी कंपनीने या वर्षी ३० हजार रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे म्हटले आहे. अर्थकारण रुळांवर येत असल्याने नोकरीच्या संधीही वाढणार आहेत. तीव्र स्पर्धा वाढल्यामुळे नोकरी मिळवणे आव्हानात्मक आहे. मात्र, तरी शिक्षण, कौशल्य आणि कार्यानुभव ही त्रिसूत्री भक्कम असणाऱ्यांनी नोकरीची चिंता करण्याची गरज नाही.
अनेक कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय उपलब्ध केला आहे. त्यामुळे भौगोलिक असमानता दूर होणार असून, गावातील तरुणांनाही नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कोरोनामुळे अनेक क्षेत्रांना फटका बसला आहे. त्यात पर्यटन क्षेत्राचाही समावेश आहे. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापन, पर्यटन व्यवस्थापन यांसारखे शिक्षण घेतलेल्या तरुणांना काही काळासाठी दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. कारण या क्षेत्राला ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय नाही. नोकरी गेल्यामुळे रडत न बसता नवीन काहीतरी शिकून नव्या क्षेत्रात प्रवेश करणे काळाजी गरज झाली आहे, असेही शिकारपूर म्हणाले.
दहावीनंतर आयटीआय केलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीेच्या अनेक संधी उपलब्ध होत असतात. नौदल, रेल्वे, सैन्यदल यासंह अनेक सरकारी संस्थांमध्येही टेक्निकल विभागात आयआयटी झालेल्या तरुणांना संधी आहेत. हवाईदल, नौदल, सैन्यदलातही दहावी-बारावीनंतर संधी आहेत. एमपीएससी, यूपीएससीच्या माध्यमातून तरुण प्रशासकीय अधिकारीही होऊ शकतात. मात्र, त्यासाठी कष्ट करण्याची तयारी, संयम, जिद्द असणे आवश्यक आहे. वाणिज्य शाखेतून शिक्षण घेणाऱ्यांसाठी बँकिंग, लेखापरीक्षण, विमा क्षेत्र, वित्तीय संस्था, एमबीए केलेल्या विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट क्षेत्रात आजही संधी आहेत. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून कौशल्य विकास केला जात असल्यामुळे त्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत.
व्यावयासिक शिक्षणाची गरज
सरकारी आणि खासगी नोकरी मिळवण्यासाठीही तीव्र स्पर्धा असल्यामुळे सध्याच्या काळात व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे. व्यावसायिक शिक्षणामुळे तरुणांचा विशिष्ट क्षेत्रातील कौशल्यविकास होतो आणि सार्वजनिक किंवा खासगी क्षेत्रात नोकरी मिळण्याची संधी वाढते. नव्या शिक्षण धोरणात व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात आल्याने अनेकांना त्याचा लाभ मिळणार आहे. दहावीनंतर आयटीआय, बारावीनंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, आयटी पदविका, पदवीनंतर एमबीए, एमसीए, पदविका, कृषी अभ्यासक्रम या माध्यमातून नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात.
कृषी क्षेत्रातील संधी
कृषी विज्ञान, कृषी अर्थशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, पुष्पोत्पादन आणि उद्यान कृषी या कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या शाखा आहेत. या शिक्षणाच्या आधारे स्वयंरोजगार मिळवता येतो. त्याचप्रमाणे खासगी व सरकारी संस्थांमध्ये नोकरीच्या संधीही आहेत. कृषी क्षेत्रातील त्रुटी दूर करणे, तोटा कमी करणे, कृषी मालाची आयात-निर्यात, मार्केटिंग या माध्यमांतूनही स्वयंरोजगार, रोजगार आणि नोकऱ्यांची संधी आहे. मात्र, कृषी क्षेत्रातील करिअरकडे आजही दुर्लक्ष होत आहे.
-------------------------------------