पुणे : फेसबुकवरून एका अनोळखी ग्रुपमध्ये जॉइन होणे एकाला खूपच महागात पडले आहे. पार्टटाइम जॉबच्या नावाखाली एका युवकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. १) तक्रार नोंदवण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक कुमार गुप्ता (वय ३९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी फेसबुकवर एक अनोळखी लिंक पाहून त्यावर क्लिक केले. लिंकवर क्लिक केल्यानंतर एका स्टॉक मार्केटच्या ग्रुपमध्ये ॲड झाले. ट्रेडिंग करण्याचा पार्टटाइम जॉब आहे. सुरुवातीला पैसे भरल्याने अधिक प्रमाणात नफा मिळतो, असे सांगण्यात आले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार यांच्याकडून एकूण ९ लाख रुपये उकळले. नंतर संशय आल्याने तक्रारदार यांनी दिलेले पैसे परत मागितले. मात्र, पैसे काढण्यासाठी आणखी ७० हजार रुपये भरण्यासाठी तगादा लावल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मीनल सुपे- पाटील करत आहेत.