लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मंजूल पब्लिशिंग हाऊस या बहुभाषिक प्रकाशन संस्थेने प्रतिलिपी डॉट कॉमसमवेत ‘एकत्र’ हा संयुक्त इंप्रिंट उपक्रम सुरू केला आहे. प्रतिलिपी डॉट कॉम या पोर्टलवर उत्तमोत्तम लेखकांच्या कथा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतात. यांपैकी उत्तम साहित्य आता छापील आणि ई-बुक अशा दोन्ही स्वरूपात एकत्रतर्फे उपलब्ध होणार आहे.
मंजूल पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक विकास रखेजा म्हणाले, प्रतिलिपीच्या माध्यमातून अनेक दर्जेदार लेखकांचे साहित्य अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचत असते. अशा लेखकांच्या कथा आता आम्ही छापील आणि डिजिटल म्हणजेच ई-बुक अशा दोन्ही स्वरूपांत वाचकांसमोर आरंभी हिंदी आणि मराठी भाषांत आणत आहोत. त्यानंतर अन्य प्रादेशिक भाषांतही विपुल प्रमाणात या कथा प्रकाशित होतील. मंजूलचा अनुवादित साहित्यातील गाढा अनुभव आणि प्रतिलिपीने डिजिटल रूपात निर्माण केलेला मोठ्या प्रमाणातील वाचकवर्ग यांचा सुरेख संगम यानिमित्ताने होणार आहे.
या पार्टनरशिपविषयी शुभम शर्मा (हेड ऑफ आयपी डेव्हलपमेंट ॲट प्रतिलिपी) म्हणाले, मंजूल आम्ही निवडलेल्या लेखकांना प्रतिलिपीमुळे आधीच मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली आहे. आता मंजूल पब्लिशिंग हाऊस आणि प्रतिलिपी डॉट कॉम यांच्या संयुक्त उपक्रमामुळे उत्तमोत्तम साहित्य वाचकांपर्यंत आणखी मोठ्या प्रमाणावर आम्ही पोहोचवू.
तीन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर
पहिल्या टप्प्यात हिंदी भाषेतील ताश्री (सुमित मेनारिया), अंगुठी का भूत (मनीष शर्मा); तर मराठीतील अनाकलनीय (संजय वैद्य) आणि बुजगावणं (कनिष्क हिवरेकर) ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.