पुणे : पत्रकार आशिष चांदोरकर यांचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. ते ४४ वर्षांचे होते. सर्वज्ञ मिडिया या ग्रुपचे ते संचालक होते. मंगळवारी रात्री ते घरी आले. रात्री झोपेतच त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सकाळी त्यांच्या घराचे दार लवकर उघडले नाही म्हणून शेजाऱ्यांनी चौकशी केली व त्यांच्या मित्रांना बोलावले. दाऱ उघडल्यावर ते झोपलेले दिसले. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यावर ते मृतावस्थेत असल्याचे निष्पन्न झाले. ते अविवाहीत होते. त्यांच्या पश्चात भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
आशिष यांनी पत्रकार म्हणून अनेक वृत्तपत्रात काम केले. त्यानंतर नियमीत नोकरी सोडून त्यांनी सर्वज्ञ मिडिया हा ग्रुप काही मित्रांबरोबर सुरू केला. त्या माध्यमातून ते काम करत. फूड ब्लॉगर म्हणून ते प्रसिद्ध होते. मध्यंतरी त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. त्यानंतर ते एकटेच पडले होते. मित्रांबरोबर मैफल जमवणे, गप्पा मारणे यासाठी ते प्रसिद्ध होते. कोरोना काळात त्यांना कोरोना झाला होता. मात्र त्यातून बाहेर पडून ते पुन्हा कार्यरत झाले होते. त्यांच्या अचानक निधनाने त्यांच्या मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे.