पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याय मागणीसाठी पत्रकारांकडे गेले, आम्ही विरोधी पक्षातले नेतेही सरकारने बोलू दिले नाही तर पत्रकारांकडेच जातो. त्यामुळे सामान्यांना न्याय मागण्यासाठी आजही पत्रकार जवळचे वाटतात, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या ‘दर्पण’ पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. या पुरस्काराचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष होते. या वेळी संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर, कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंत भोसले आणि महाराष्ट्र राज्य प्रसारमाध्यम व वृत्तपत्रे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष ‘लोकमत’चे मुंबईतील विशेष प्रतिनिधी यदू जोशी, ज्येष्ठ स्तंभलेखक भाऊ तोरसेकर (मुंबई), दैनिक नवशक्तीचे (मुंबई) संपादक सुकृत खांडेकर, ज्येष्ठ पत्रकार व जलनितीतज्ज्ञ सुधीर भोंगळे यांना ‘दर्पण जीवनसन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले.‘सत्यमेव जयते’चा खरा अर्थ पत्रकारितेने दाखवला. गौरी लंकेश यांच्यासारख्या पत्रकाराची हत्या होते. याबद्दल आनंद व्यक्त करणारा वर्ग देशात आहे, याबद्दल जयंत पाटील यांनी खंत व्यक्त केली. ‘रिपोर्टर विदाऊट बॉर्डर’ या संस्थेचा दाखला देत पत्रकारांना सर्वाधिक धोका मोदींच्या राष्ट्रवादी धोरणाचा आहे. प्रेस फ्रीडममध्ये भारत १३६ व्या क्रमांकावर पॅलेस्टाईन आणि अफगाणिस्तान आपल्या पुढे आहेत. मोदी सरकार आल्यापासून ५४ हल्ले पत्रकारांवर झाले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
न्याय मागण्यासाठी पत्रकारच जवळचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 5:33 AM