पुणे: वैयक्तिक वादातून एका पत्रकारावर गेल्या १५ दिवसात दुसऱ्यांदा हल्ला होण्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी रात्री दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी या पत्रकारावर गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
याबाबत हर्षद कांतीलाल कटारिया (वय ३९, रा. महर्षीनगर) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हर्षद कटारिया हे एका दैनिकांमध्ये उपनगर वार्ताहर म्हणून काम करतात. तसेच ते रियल इस्टेट एजन्सीचे काम करतात. शुक्रवार पेठेत हर्षद डेव्हलपर्स म्हणून त्यांचे कार्यालय आहे. रविवारी रात्री ते दुचाकीवरुन घरी जात असताना सोसायटीच्या गेटजवळ आले होते. त्यावेळी पाठीमागून मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्यांने त्यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडली. यापूर्वी त्यांच्यावर हल्ला झाला असल्याने ते सावध होते. ते खाली झुकल्याने हल्लेखोरांचा नेम चुकला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परंतु तेथे पुंगळी मिळून आली नाही.
यापूर्वी हर्षद कटारिया यांची २७ मे रोजी गाडी अडवून डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. हर्षद कटारिया यांची धायरीला वडिलोपर्जित जमीन असून त्याबाबत दिवाणी दावा चालू आहे. तसेच महापालिकेने बांधकामावर कारवाई केल्याने काही जणांचा त्यांच्यावर रोष आहे. त्यातून हा प्रकार घडला का याचा तपास पोलीस करीत आहेत.