पुणे - पत्रकारिता ही समाजाप्रति असलेली जबाबदारी आहे याची जाणीव असलेल्यांनी या क्षेत्रात काम करण्यासाठी येणे आवश्यक आहे. पैसे कमावण्यासाठी किंवा झगमगाटाची अपेक्षा ठेवणाऱ्यांसाठी हे क्षेत्र नाही. उत्तर मिळण्याची वाट न पाहता प्रश्न विचारत राहाणे व त्यांचा पाठपुरावा करणे हे पत्रकाराचे काम आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ भाटिया यांनी व्यक्त केले.समाजमाध्यमे हे नव्याने एक बलशाली माध्यम म्हणून पुढे येत आहे मात्र पत्रकारितेतील मोठ्या समूहांना त्याची ताकद उमजलेली नाही. त्यामुळे समाजमाध्यमांच्या वापराचे बहुतांश प्रयोग हे लहान स्तरावरून सुरू होत असल्याचे चित्र आहे. मुद्रित व आॅनलाईन पत्रकारितेतील स्टार्ट अप प्रकल्पांचे भवितव्य उज्ज्वल असेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. दिवंगत ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त भाटिया यांनी ‘क्रायसिस इनइंडियन मीडिया’ या विषयावर आपले विचार मांडले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ग्रंथालीचे धनंजय गांगल, सावित्राबाई फुले पुणे विद्याापीठाच्या वृत्तपत्र आणि संज्ञापन विद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे व सुवर्णा साधू व्यासपीठावर उपस्थित होत्या. भाटिया म्हणाले, २०१४ नंतर पत्रकारितेच्या क्षेत्रात अमूलाग्र बदल झाले आहेत. कोणत्या विषयावर लिहायचे व बोलायचे यावर माध्यम कंपन्यांच्या व्यवस्थापनाचे थेट नियंत्रण येत आहे. असे नियंत्रण झुगारणाºयांची नोकरी धोक्यात येत आहे. प्रश्न विचारणाºयांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. २०१४पूर्वी पत्रकारितेचा सुवर्णकाळ होता असे नाही. मात्र सरकार आणि यंत्रणांकडून थेट हस्तक्षेप कधीही करण्यात आलेला नाही. पुढील काळात भारतीय इलेक्ट्रॉनिक मीडियाला फारसे महत्त्व राहाणार नाही. आॅनलाईन, व्हीडिओ हेच डिजिटल माध्यम म्हणून प्रभावी ठरणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.साधू यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त जाहीर करण्यात आलेली पाठ्यवृत्ती ‘लोकमत’ नाशिकच्या पत्रकार मेघना ढोके यांना प्रदान करण्यात आली. आसाम आणि एनआरसी प्रक्रिया या विषयावर अभ्यास करण्यासाठी ही पाठ्यवृत्ती देण्यात आली.
प्रश्न विचारणे पत्रकारांचे काम - सिद्धार्थ भाटिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 1:58 AM