गोरख जांबले वासुंदे : दौंड तालुक्यातील वासुंदे हे जेमतेम १७५० लोकसंख्या असलेले गाव. छोट्याशा खेडेगावातील युवकाने तारुण्य देशसेवेसाठी खर्च करुन १८ वर्षांची सेवा सैन्यदलात सैनिक म्हणून केली. सेवानिवृत्त झाल्यानंतर घरी न बसता अभिनय क्षेत्रात यशस्वी पदार्पण करुन सैनिक ते अभिनेता असा जिगरबाज प्रवास सुरु केला आहे. विक्रम सुर्यकांत जगताप असे त्या तरुणाचे नाव. इयत्ता ९ वी म्हणजेच माध्यमिक शिक्षण घेत असतानाच सैन्यदलात जाण्याचा ध्यास त्यांनी अंगी बाळगला होता. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांनी गावातीलच श्री गुरुकृपा माध्यमिक विद्यालयात १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र, शिक्षणापेक्षा सैन्यदलात जाण्याची त्यांची धडपड त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती. इयत्ता १२ वी मध्ये शिकत असतानाच सैन्यदलाची भरती निघाली. सन २००१ मध्ये सैन्यदलाच्या मराठा लाईट इन्फन्ट्री मध्ये भरती होऊन बेळगाव याठिकाणी प्रशिक्षण पुर्ण केले. प्रशिक्षणानंतर राजस्थानच्या पाकिस्तान सीमेवर त्यांची सैनिक म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर जम्मू काश्मीर, पंजाब, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या राज्यामध्ये सैनिक म्हणून कार्यरत राहिले. एवढेच नव्हे तर भूतान या परदेशातही त्यांनी काही काळ सेवा बजावली.१८ वर्षांची सैन्यदलातील यशस्वी कारकीर्द पुर्ण करुन ते सन २०१८ साली निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी घरी न बसता बारामती शहरामध्ये सैन्यभरती पुर्व प्रशिक्षण मोफत देण्यास सुरुवात केली. याचा फायदा होऊन वासुंदे गावातील ५ तरुण होमगार्डमध्ये भरती करण्यात त्यांचा मोलाचा वाटा ठरला. हे करत असतानाच त्यांनी स्वत: स्पर्धा परिक्षेची तयारी सुरु केली. अशातच त्यांना त्यांचे गुरु मनोहर मामा यांच्या प्रेरणेने अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याची संधी मिळाली. टेलिव्हीजनवरील कलर्स मराठी या चॅनलवर प्रसिद्धी झोतात असलेल्या ‘बाळुमामांच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत रामा नावाची भुमिका साकारण्याची संधी मिळाली. २८ मे २०१९ या दिवशी मालिकेतील रामा या पात्रासाठी शुटींग करण्याचा योग आला. आज यशस्वीपणे या मालिकेत अभिनय करत आहेत.
भावनाशुन्य क्षेत्र ते भावनाप्रधान क्षेत्र असा प्रवास एक भावनाशुन्य क्षेत्र ते भावनाप्रधान क्षेत्र असा त्यांचा जिगरबाज प्रवास सुरु झाला. कारण सैनिक म्हणून काम करत असताना भावनाशुन्य व्हावे लागते तर अभिनय क्षेत्रात काम करताना भावनाप्रधान व्हावे लागते असे त्यांचे मत आहे. खरंच सीमेवर बंदूक चालवणे सोपे पण कॅमेऱ्यासमोर अॅक्टींग करणे फार अवघड आहे, असे ते सांगतात. त्याचबरोबर त्यांच्या यशामध्ये आई, वडील, पत्नी, मुले, भाऊ, भावजय आणि त्यांचे गुरु मनोहरमामा यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी आवर्जून सागितले.