लोकमत न्यूज नेटवर्कदावडी : जऊळके (खुर्द) ता. खेड येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची भिंत पावसाने कोसळून चार लाख रुपये किमतीचे शालोपयोगी वस्तुचे नुकसान झाले. रात्रीच्या वेळी ही दुर्घटना घडल्याने सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.जऊळके (खुर्द) येथे जिल्हा परिषद शाळा आहे. इयत्ता १ली ते ७वी पर्यंत वर्ग आहे. या शाळेमध्ये ६८ विद्यार्थी शिक्षण घेतात. (दि.१५) रात्रीच्या सुमारास पावसाच्या पाण्याने इमारतीचा पाया खचून इमारतीची भिंत कोसळली. भिंत कोसळल्यामुळे इमारतीच्या खोलीतील संपूर्ण ई-लर्निंग सेट, विद्यार्थी बसण्याची बाकडे, खुर्च्या, कपाटात ठेवलेले जुने रकॉर्ड, वाचनालय पुस्तके व इतर शालोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. भिंत कोसळल्यामुळे अंदाजे चार लाख रुपायांचे नुकसान झाले असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मा सातकर यांनी सांगितले. दुर्दैवाने दिवसा शाळा सुरू असताना इमारतीची भिंत कोसळली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, असे ग्रामस्थांनी बोलताना सांगितले.
जऊळकेत जिल्हा परिषद शाळेची इमारत कोसळली
By admin | Published: July 17, 2017 3:44 AM