पुणे : सदनिका आणि दागिने देण्याच्या बहाण्याने एका प्रथमवर्ग न्यायाधिशाने शेजारी रहात असलेल्या १५ वर्षिय मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे आंबेगाव परीसरात खळबळ उडाली असून भारती विद्यापीठ पोलिसांनी या न्यायाधिशाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच हा न्यायाधिश पसार झाला आहे. नागराज सुदाम शिंदे (वय ३५, रा. स. नं. आंबेगाव पठार) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आहे. तो सातारा जिल्ह्यातील खंडाळा न्यायालयामध्ये न्यायाधिश होता. तर पिडीत मुलगी १५ वर्षांची असून ती दहावी उत्तीर्ण झालेली आहे. तिचे वडील पुण्यातील एका ख्यातनाम शाळेमध्ये शिक्षक आहेत. आरोपी व पिडीत मुलगी एकाच इमारतीमध्ये राहण्यास आहे. शिंदे याचे व पिडीत मुलीच्या घरच्यांचे एकमेकांच्या घरी येणेजाणे आहे. त्याची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेली आहे. पिडीत मुलगी शिंदे याच्याकडे कॅरम खेळायला जात असे. नेहमीचे जाणे येणे असल्यामुळे तिच्या मनात आरोपीबाबत संशय नव्हता. परंतु शिंदे याने एक ते दिड महिन्यापुर्वी या मुलीला मोबाईल, कानातील रिंगा आणि सदनिका घेऊन देतो असे आमिष दाखवले. गोड गोड बोलून तिला भुलथापा देऊन तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच याबाबत कोणालाही काहीही सांगू नकोस अशी धमकीही दिली. दरम्यान, पिडीत मुलीने ही बाब तिच्या कुटुंबियांना सांगितली. नेमके काय करावे या विवंचनेत असलेल्या पिडीत मुलीच्या वडीलांनी जाणिव संघटनेच्या महिला अत्याचार निवारण विभागाच्या उपाध्यक्षा कांचन दोडे यांची मदत घेतली. दोडे यांच्या पाठपुराव्यामुळे मुलीच्या घरचे फिर्याद द्यायला तयार झाले. दोडे यांच्यासह मुलीच्या कुटुंबियांनी वरिष्ठ निरीक्षक चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना हकीकत सांगितली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करुन घेतला. परंतु गुन्हा दाखल होताच शिंदे पसार झाला आहे. तो सातारा जिल्ह्यातील खंडाळा न्यायालयात न्यायाधिश होता.(प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीवर न्यायाधीशाचा बलात्कार
By admin | Published: August 01, 2014 5:22 AM