पुणे : नवरात्रोत्सवामुळे जुई, मोगरा, चमेली, कागडा फुलांची मागणी प्रचंड वाढली आहे. यामुळे जुई, मोगरा तब्बल एक ते दीड हजार रुपये किलो दर मिळत आहे.गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील फुलबाजारात जुईच्या फुलास ७०० ते १ हजार रुपये प्रतिकिलोस भाव आहे. तर चमेलीस ४०० ते ५०० रुपये, कागडा ५०० ते ६०० रुपये आणि मोगºयास ७०० ते १३०० रुपये प्रतिकिलोस भाव मिळाल्याची माहिती फुलांचे व्यापारी आशुतोष राऊत यांनी दिली़सध्या नवरात्रोत्सव सुरु असल्यामुळे गजºयासाठी लागणाºया जुई, कागडा आणि चमेलीला सर्वाधिक मागणी होत असून दरामध्येही दुपटीहून अधिक वाढ झाली आहे़ जुई आणि चमेलीच्या फुलांना सुगंध असतो तर कागड्याला सुगंध नसतो़ त्यातही जुईची फुले ही दोन दिवस टिकतात तर चमेलीचे फूल अवघा एक दिवसच टिकते़ चमेलीस जुईपेक्षा जास्त वास असतो़ बाजारात जुईची सर्वाधिक आवक कुंजीरवाडी,नायगाव व परिसरातून होत असून जुईचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. तसेच नवरात्रोत्सवामुळेमागणी मोठ्या प्रमाणात असल्याने दरात वाढ झाली आहे़ जुईची ४०० किलो तर मोगºयाची अवघी ५० किलो इतकी मार्केट यार्डात आवक झाली आहे़सध्या मार्केट यार्डात चमेलीची आवक तळेगाव ढमढेरे परिसरातून होत आहे तर कागड्याची आवक कर्नाटकातून होत आहे़ वेणीसाठी शेवंतीच्या फुलांचा वापर केला जातो, त्यास सध्या ८० ते १५० रुपये भाव मिळत आहे़ यवतजवळील असणाºया माळशिरस परिसरातून शेवंतीची आवक होत आहे़
जुई, मोगरा तब्बल एक ते दीड हजार रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 4:42 AM