पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून ज्युली आमचा जीव की प्राण झाली आहे. रविवारपासून ती गायबच आहे. शेजाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले आणि ती घाबरून जी पळाली, ती परत घरी आलीच नाही. आम्ही तिला खूप शोधले. रात्रंदिवस तिच्या आठवणीत जगत आहोत, काय करावे काही कळेना गेलेय, अशा भावना ज्युली या पाळीव श्वानच्या मालकिणीने व्यक्त केल्या आहेत. दीपाली सत्तेसा यांनी ही व्यथा मांडली आहे. विश्रांतवाडी परिसरात त्या राहतात.
ज्युली ही त्यांच्या घरी गेल्या १३ वर्षांपासून घरातील सदस्य म्हणून राहत आहे. तिची आई अगोदर घरी राहत होती. तिला पिल्लं झाली आणि ज्युली सत्तेसा परिवाराची भाग बनली. ती घरातील सर्वांची आवडती बनलेली आहे. पण रविवारपासून घरी परत आली नसल्याने सर्वजण चिंतेत आहेत. घरातील एक सदस्यच नसल्याची जाणीव प्रत्येकाला त्रास देत आहे. तिच्याविना घर सुने सुने वाटत असल्याचे दीपाली सत्तेसा यांनी सांगितले. फटाक्यांच्या आवाजाने प्राण्यांवर खूप परिणाम होतो. कारण त्यांना आपल्यापेक्षा सातपट अधिक ऐकू येते. खूप आवाज झाला की ते पळून जातात.
''घरात काम करत असताना आजुबाजूला ज्युली असायची. तेव्हा सर्वांनाच छान वाटायचे. आम्ही बोलले तिला सर्व समजायचे. कित्येक वर्षांपासून तिची सवय झाली हाेती. लळा लागला होता. अचानक ती पळून गेल्याने घरात दु:खाचे वातावरण आहे. आम्ही खूप शोधत आहोत. आजुबाजूला सांगितले की, कोणाला दिसली तर सांगा. पोलीसांमध्येही आता तक्रार देणार आहोत. रविवारी तुळशीविवाह असल्याने शेजाऱ्यांनी खूप फटाके फोडले होते. त्या वेळी ती घराखालीच गेलेली होती. पण फटाक्यांचा आवाज तिला सहन झाला नाही आणि ती जोरात पळाली. पण नंतर कुठे दिसलीच नाही. आम्हाला वाटलं परत येईल. पण तिला आमच्या घरचा पत्ता सापडत नसावा. कारण घराशिवाय खूप दूर ती कधी गेली नव्हती. - दीपाली सत्तेसा, ज्युलीची पालक''