पिंपरी : सहकारी संस्था अधिनियमांतर्गत कारवाई सुरु असलेली दि पुणे पोस्ट अँड टेलिकॉम क्रेडिट सोसायटी सहकारी उपनिबंधकांचा आदेशही जुमेनाशी झाली आहे. तक्रारदारांना आवश्यक कागदपत्रदेण्याचे आदेश देऊनही संस्थेने कोणतीही कारवाई न केल्याने उपनिबंधकांना पुन्हा स्मरणपत्र काढण्याची वेळ आली.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पोस्ट अँड टेलिकॉम संस्थेवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०च्या कलम ८८ नुसार कारवाई सुरु आहे. या प्रकरणी संस्थेचे तत्कालीन संचालक रामदास बाळू सातव आणि तक्रारदार गणेश तिखे यांना संस्थेकडे कागदपत्र मागितली होती. संस्था कागदत्र देत नसल्याने सहकारी उपनिबंधकांकडे तक्रार दिली. त्यावर सहकारी उपनिबंधकांनी २९ डिसेंबर २०२० रोजी संस्थेला संबंधितांना कागदपत्र देण्यास बजावले. कागदपत्र न मिळाल्याने चौकशी कामकाजास विलंब होत असल्याचे उपनिबंधकांनी स्पष्ट केले. त्यानंतरही पोस्ट अँड टेलिकॉमच्या पदाधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे दिली नाहीत. त्यामुळे सहकारी उपनिबंधकांनी पूर्वीच्या आदेशपत्राचे स्मरण देत तक्रारदारांना कागदपत्र देण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतरही कागपत्रे न दिल्यास उद्भवणाऱ्या स्थितीला आपणच जबाबदार रहाल असेही उपनिबंधकांनी नमूद केले आहे.