पुणे : जम्बो हॉस्पिटल सर्वसामान्य कोरोनाबाधितांना मोफत उपचारासाठी महापालिकेने सुरू केले. पण येथील काही रूग्ण त्याची कदर न करता, उपचार घेतानाही तंबाखू, गुटखाही व्हाव करीत आहेत. विशेष म्हणजे त्यांचे सगेसोयरे देखील याचा पुरवठा करण्यात कसर करीत नसून, हा पुरवठा करताना कोणाला कळू नये म्हणून चक्क पॅटच्या पायाच्या बॉटममध्ये तंबाखू व चुना पुडी शिलाई करून पुरवण्याचा कळस केला आहे.
जम्बो हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या या प्रकारामुळे सर्वच जण अवाक झाले असून, उपचार घेताना तरी दहा दिवस व्यसने कशासाठी करता म्हणून प्रशासनासह, डॉक्टर नर्स यांनीही डोक्याला हात लावला आहे. परिणामी जम्बो हॉस्पिटलमधील रूग्णांना पाठविण्यात येणाऱ्या प्रत्येक वस्तू आता बारकाईने तपासण्याचा नुसती उठाठेव हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षकांच्या मागे लागली आहे. त्यामुळे सर्व नियमांचे पालन करणाऱ्या रूग्णांना वैद्यकीय सल्ल्यानुसार आवश्यक खाद्यपदार्थ, कपडे पुरविण्यासाठीही संबंधितांच्या नातेवाईकांना तपासणीच्या रांगेत तासन् तास थांबावे लागत आहे.
जम्बो हॉस्पिटलमध्ये सध्या ३३९ रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, ५७ जण आयसीयूमध्ये आहेत. तर ९१ जणांवर एचडीयूमध्ये उपचार सुरू आहेत. पण यातील काही रूग्ण उपचारापेक्षा व्यसनांना अधिक महत्व देत असल्याचे दिसून आले आहे. जेवणाच्या डब्यामध्ये वरच्या कप्प्यात वरणभात चपाती असल्या तरी सर्वात खालच्या कप्प्यात तंबाखू, गुटखा आढळून येत आहे. तर घडी घातलेल्या शर्ट पँटच्या खिशात, प्लॅस्टिकच्या पिशवीत तंबाखू, सुपारीही पाठविली जात होती. विशेष म्हणजे सुपारीचे खांड फोडण्यासाठीचा अडकित्ताही पाठविण्याचा प्रताप एका रूग्णाच्या नातेवाईकाने केला आहे.
गुटख्याच्या पुड्या, तंबाखू एवढ्यावर न थांबता चक्क एका रूग्णाला चाकू पाठविण्यात येत असल्याचेही आढळून आले आहे. यामुळे जम्बो हॉस्पिटलमधील सुरक्षा तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे.
-------------------
दारूचीही झाली मागणी
जम्बो रूग्णालयात काम करणाऱ्या वॉर्डबॉयकडे चक्क दारू आणून दे तुला एक हजार रूपये देतो असेही प्रकार समोर आले आहेत. गेल्या दोन दिवसात अशी मागणी करणारे सात प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे रूग्णांना अशाप्रकारे मदत करणाऱ्या वॉर्डबॉय तथा अन्य कर्मचारी आढळून आल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांना कामावरून कमी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिले आहेत.
-----------------------
रूग्णांवर काय कारवाई करावी
जम्बो हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या ज्या कोरोनाबाधितांनी अशाप्रकारे तंबाखू, गुटखा, दारू यांची मागणी केली आहे़, अशा रूग्णांवर कारवाई तरी कशी करायची़ ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रूग्णांची काळजी घेणाºया हॉस्पिटल प्रशासनाला त्यांचा जीव वाचविणे महत्वाचे आहे. अशावेळी त्यांना तेथून या कृत्यामुळे बाहेर काढता येत नाही. परंतु, संबंधित रूग्णांच्या सग्या-सोयऱ्यांनी तरी याचा विचार करावा, अशी विनवणी करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
संबंधित प्रकार उघडकीस आल्यावर महापालिका अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी येथील रूग्णांना पाठविण्यात येणाºया वस्तूंची कसून तपासणी करण्यात यावी अशी सक्त ताकीद सुरक्षा रक्षकांना दिली आहे. काही मोजक्या रूग्णांमुळे सर्वच रूग्णांच्या नातेवाईकांना या तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, जम्बो हॉस्पिटलमधील रूग्णांसह सर्व सुरक्षिततेसाठी ही बाब आवश्यक असल्याचेही अग्रवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.