पुणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही रुग्णांना दिलासा देणाऱ्या जम्बो कोविड सेंटरचे प्रशासन राजकीय दहशतीखाली काम करीत असल्याचे चित्र आहे. काही 'मातब्बर' नगरसेवक जम्बोमधील हाऊसकीपिंग, जेवण आणि अन्य कामांची कंत्राटे त्यांच्या कार्यकर्त्यांना देण्याबाबत दबाव टाकत आहेत अन्यथा ‘केलेल्या कामाची बिले कशी निघतात तेच बघतो’, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ७०० रुग्णांच्या जीवितापेक्षा कार्यकर्त्यांचे खिसे भरणे अधिक महत्त्वाचे आहे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तीन आठवड्यांपूर्वी पालिकेने जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात आरोग्य व्यवस्था पुन्हा हेलखावे खाऊ लागली आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत यावेळी आरोग्य व्यवस्था अधिक बळकट झाली असली, तरी ती वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कमीच पडत आहे. पहिल्या लाटेत जम्बो कोविड सेंटरचा आधार मिळाला होता. दुसऱ्या लाटेमध्येही तब्बल ७०० रुग्णांवर याठिकाणी उपचार सुरू करण्यात आलेले आहेत. रुग्णांवर उपचारांसाठी मेडिब्रोस ही एजन्सी नेमण्यात आलेली आहे.
या ठिकाणी उपचरांसोबतच दैनंदिन स्वच्छता, लॉंड्री, झाडणकाम, कँटिन आदी कामे केली जातात. ही कामे मिळविण्यासाठी काही नगरसेवक प्रशासनावर दबाव टाकत आहेत. ही कामे आपल्याच कार्यकर्त्यांना देण्यासाठी काही नगरसेवक थेट धमकावणीच्या सुरातच बोलत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे रुग्णालय प्रशासन धास्तावले आहे.
------
जम्बो कोविड सेंटरचे व्यवस्थापन पीएमआरडीएकडे असताना हे प्रकार घडत नव्हते. परंतु, यावेळी पूर्णपणे जम्बो पालिकेच्या ताब्यात आहे. जम्बो पालिकेच्या ताब्यात येताच काही नगरसेवकांची 'हिशेबी' वृत्ती जागी झाली आहे.
------'रेमडेसिविर'साठी थेट आत घुसून दादागिरी!
'रेमडेसिविर' इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. काही राजकीय कार्यकर्ते रविवारी सकाळी जम्बो कोविड सेंटरमध्ये घुसले. ''आम्हाला आत्ताच्या आत्ता इंजेक्शन द्या'', अशी धमकवणीची भाषा सुरू केली. जम्बोमधील रुग्णांसाठी हे इंजेक्शन असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, या कार्यकर्त्यांनी 'इंजेक्शन' न मिळाल्यास तोडफोड करण्याची धमकी दिल्याने भीतीचे वातावरण पसरले होते.