लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर : उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर, आंबेगाव व खेड तालुक्यांतील कोरोनाबाधित रुग्णांसाठी अवसरी खुर्द येथे २८८ बेडचे जम्बो कोव्हिड हॉस्पिटल उभारले जाणार आहे. याला प्रशासकीय मान्यता मिळाली असून हे उभारण्यासाठी २४.२४ कोटी रुपये खर्च येणार आहे. येत्या महिन्याभरात हे सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न राहाणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
मंचर येथे झालेल्या पत्रकार परिषदेचे मध्ये त्यांनी माहिती दिली. यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा हे उपस्थित होते. वळसे पाटील म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट आली तर रुग्णांचे प्रमाण वाढू शकते. या तिसऱ्या लाटेत लहान मुले जास्त बाधित होणार आहे असे तज्ज्ञ सांगत आहेत. याची पूर्वतयारी करण्यासाठी व सध्या एका घरातील अनेक रुग्ण बाधित होत आहेत, त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक रुग्णांना खासगीतील खर्च परवडत नाही.
म्हणून अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील मुलींच्या वसतिगृहात जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याची योजना तयार केली आहे. मेडिकल स्टाफ मिळाला व ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला तर एका महिन्यात एक हॉस्पिटल सुरू करण्याचा प्रयत्न राहाणार आहे. यासाठी देवेंद्र शहा, प्रांताधिकारी व तालुक्यातील इतर अधिकाऱ्यांनी अतिशय गतीने याचा प्रस्ताव सादर केला. याला विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे.
चौकट
अवसरी खुर्द येथील जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये २८८ असतील. यातील २४० बेड ऑक्सिजनचे, ४८ आयसीयू, ४० व्हेंटिलेटर असतील. या रुग्णालयासाठी २४.२४ कोटी रुपये खर्च येणार आहे. यातील ११.६० कोटी रुपये आपत्ती व्यवस्थापना मधून ११.६९ कोटी रुपये जिल्हा नियोजन मधून तर ९४ लक्ष रूपये दानशूर व्यक्तीमार्फत उभे केले जाणार आहेत.
चौकट
चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन, महसूल व पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तीन दिवस प्रत्येकाने काळजी घ्या, अंदाज घेऊन घराच्या बाहेर पडा, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.
फोटो : अवसरी खुर्द येथे उभारण्यात येणाऱ्या जम्बो कोविड रुग्णालयासंदर्भात माहिती देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील.