हडपसर परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यात महापालिकेचा एकही सक्षम दवाखाना उपलब्ध नाही, खाजगी दवाखान्यावर ताण येत आहे. रूग्णांना वेळीच उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेने येथे जंबो कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी केली.
हडपसर येथे जंबो कोविड सेंटर व्हावे, यासाठी शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी आज मनपा आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. या वेळी जिल्हाप्रमुख विजय देशमुख, नगरसेवक नाना भानगिरे, उपशहरप्रमुख समीर तुपे, नगरसेविका संगीता ठोसर, विधानसभा प्रमुख राजेंद्र बाबर, समन्वयक तानाजी लोणकर, विभागप्रमुख प्रशांत पोषण, उपविभागप्रमुख महेंद्र बनकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या आठवड्यात आयुक्त विक्रम कुमार यांनी शिवसेना पदाधिकारी यांच्यासमवेत ग्लायडिंग सेंटरची पाहणी केली होती. या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी असल्याने यावर चर्चा करण्यात आली. ग्लायडिंग सेंटर व्यतिरिक्त हडपसरमध्ये कुठेही जंबो कोविड सेंटर उभारले तरी चालेल. हडपसर येथे जंबो कोविड सेंटरची अत्यंत गरज असून, नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून जंबो कोविड सेंटरची गरज असल्याचे आढळराव पाटील म्हणाले.