पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दैनंदिन रुग्णसंख्या आणि सक्रिय रुग्णसंख्या वाढली आहे. नागरिकांना रुग्णालयात बेड मिळणे अवघड होऊ लागले आहे. त्या अनुषंगाने पालिकेने जानेवारी महिन्यात बंद केलेले जम्बो कोविड रुग्णालय पुन्हा सुरू केले आहे. हे रुग्णालय सुरू होताच एका दिवसात तब्बल ५१ रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले आहेत.
राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे पुणे महापालिका, पीएमआरडीए आणि जिल्हा प्रशासनाने एकत्र येत जम्बो कोविड सेंटर उभे केले होते. ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या या रुग्णालयाचा रुग्णांना फायदा झाला होता. सुरुवातीच्या काळात वैद्यकीय एजन्सीच्या गोंधळामुळे उपचारांमध्ये दिरंगाई होत होती. त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर पालिकेने येथील व्यवस्था ताब्यात घेत सुधारणा घडवून आणल्या होत्या. ऑक्टोबर महिन्यानंतर शहारातील रुग्णसंख्या घटत गेली. जानेवारी महिन्यात शहरात रुग्णसंख्या नीचांकी स्तरावर पोचली होती. त्यामुळे १५ जानेवारी रोजी जम्बो बंद केले होते.
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढत गेली. गेल्या दीड महिन्यात रुग्णवाढीचा दर २३ टक्क्यांवर पोचला आहे. बहुतांश रुग्ण गृहविलगीकरणामध्ये राहून उपचार घेत आहेत. मात्र, अत्यवस्थ आणि ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे खाटा मिळत नसल्याची ओरड सुरू झाली आहे. पालिकेने जम्बो सुरू करण्याचा निर्णय घेत तयारीला सुरुवात केली होती. सोमवारी दुपारनंतर रुग्ण दाखल करून घेण्यास सुरुवात केली आहे.
--------
जम्बोमधील दाखल रुग्ण
अलगिकरणात (सीसीसी) - ३५
ऑक्सिजनवर - ०९
आयसीयू - ०७
एकूण - ५१