पुणे : पुण्यातील जम्बो हॉस्पिटलने ऑक्सिजनचा विनाकारण वापर टाळता येऊ शकेल का, याचे मॉनिटरिंग सुरू केल्यावर जम्बो हॉस्पिटलमध्ये १८ एप्रिलपासून दररोज साधारणत: सहा टन बचत होत आहे़ बाणेर येथील कोविड केअर सेंटरमध्येही याच पध्दतीने उपाययोजना केल्याने दोन टन बचत झाली आहे.
जम्बो हॉस्पिटलमध्ये सध्या ७०० कोरोनाबाधित उपचार घेत आहेत़ दिवसाला साधारणत: २२ टन ऑक्सिजन लागत होता़ ८०० रुग्ण दाखल झाल्यास दिवसाला सुमारे १८ टन ऑक्सिजन लागेल, असा टेक्निकल टीमचा अंदाज होता़ त्यामुळे महापालिका प्रशासनाने मॉनिटरिंग सुरू केले़ प्रत्येक वार्डात सीसीसी यंत्रणेव्दारे कुठे व्हॉल्व विनाकारण चालू आहे का, एखादा रूग्ण जेवण करत असतानाही तेथे पुरवठा सुरू राहिला आहे का, रूग्ण मोबाईलवर बोलत आहे, बाथरूमला गेला आहे तरीही ऑक्सिजन पुरवठा होऊन तो वाया जात आहे का चाचपणी सुरू झाली़ त्यावर उपाययोजना केल्या. त्यामुळे १८ एप्रिलपासून जम्बो हॉस्पिटलमध्ये दररोज साधारणत: सहा टन ऑक्सिजनची बचत होऊ लागली आहे़ महापालिकेच्या बाणेर येथील डेडिकेट कोविड हॉस्पिटलमध्येही हाच प्रयोग राबविल्याने दिवसाला २ टन आॅक्सिजन बचत होत आहे़
------------------------------
मनुष्यबळ वाढविण्याबरोबरच सुपरवायझिंंगही वाढविले
रुग्णाला प्रत्येक मिनिटाला सुमारे ५ लिटर ऑक्सिजन लागतो़ सध्या जम्बो हॉस्पिटलमध्ये ७०० रूग्ण दाखल आहेत़ येथे दिवसाला ऑक्सिजन बेडसह, व्हेंटिलेटर बेडकरिता दिवसाला २२ टन ऑक्सिजन लागत होता़ विनाकारण वापर टाळण्यासाठी महापालिकेने येथे मनुष्यबळ वाढविण्याबरोबरच सुपरवायझिंगही वाढविले़ यामुळे दिवसाला ६ टन बचत झाली. ऑक्सिजननविना आपण दहा पंधरा मिनिटे काय, दोन-तीन तास राहू शकतो़ त्यामुळे माझी प्रकृती लवकरच ठीक होऊन मी घरी कोरोनावर मात करून लवकरच घरी जाईल, असा आत्मविश्वासही येथे उपचार घेणाऱ्या रूग्णांमध्ये निर्माण झाला.
- रूबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
--------------------------