पुणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांना दिलासा देणाऱ्या जम्बो कोविड रुग्णालयातील रुग्ण भरती बंद करण्यात आली आहे. सोमवारपासून (दि. १४) याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. जम्बोमधल्या चारशे खाटा कमी केल्या असून तीनशे खाटा कार्यान्वित ठेवण्यात आल्या आहेत. याही टप्प्याटप्प्याने कमी केल्या जाणार आहेत. महिन्याभरात आवश्यकता वाटल्यास पुन्हा त्या उपलब्ध केल्या जातील.
पहिली लाट ओसरल्यानंतर जम्बो रुग्णालय १५ जानेवारीला बंद करण्यात आले. त्यानंतर २२ मार्चपासून जम्बो पुन्हा सुरू करण्यात आले होते. दुसऱ्या लाटेत जम्बोची क्षमता सातशे रुग्णांपर्यंत वाढविण्यात आली होती. मागील चार आठवड्यांपासून रुग्णसंख्या झपाट्याने खाली गेली आहे. शहराचा ‘पॉझिटिव्हीटी रेट’ही पाच टक्क्यांच्या खाली आला. ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्याही कमी झाल्याने ऑक्सिजन खाटांची गरज कमी झाली आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल यांनी ही माहिती दिली.