पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळातर्फे पुणे, सातारा, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्नगटासाठी ३ हजार १३९ सदनिका व २९ भूखंडांच्या विक्रीसाठी येत्या ३० जून रोजी सोडत काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) संकेतस्थळावर येत्या गुरुवारी (दि.१७) या सोडतीची सविस्तर माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे, असे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.सोडतीसाठी आॅनलाइन अर्ज १९ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत करता येईल. स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी २४ जून रोजी प्रसिद्ध करून हरकतींचा विचार करून अंतिम यादी २६ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटीमधील आयटी इन्क्युबेशन सेंटरमध्ये ३० जून रोजी सकाळी १० वाजता आॅनलाईन संगणकीकृत सोडत काढण्यात येईल. त्यादिवशी सायंकाळी ६ वाजता सोडतीद्वारे यशस्वी झालेल्या सदनिका व भूखंडांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.या सोडतीसाठीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पादन गटातील अर्जदारांसाठी अनामत रक्कम अनुक्रमे ५ हजार, १० हजार, १५ हजार आणि २० हजार राहणार आहे. म्हाडा पुणे मंडळ एकाच वेळी ३ हजार घरांची लॉटरी काढून नवा इतिहास घडविला जाणार आहे, असा दावा पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक काकडे यांनी केला आहे.>म्हाडाच्या संकेतस्थळावर येत्या १९ मे रोजी दुपारी १२ वाजल्यापासून अर्जासाठी नावनोंदणी करता येईल. तर २० मे रोजी सोडतीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्यास सुरूवात होईल. तसेच १८ जून रोजी वाजता अर्जासाठी नोंदणी बंद करण्यात येईल.या सोडतीची माहिती पुस्तकी व आॅनलाइन अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
म्हाडा सदनिकांची सोडत ३० जूनला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 1:32 AM