इंदापूर: यशवंत घरकुल योजनेतील घरकुल बांधकाम निधीचा चेक देण्याच्या मोबदल्यात लाभार्थ्याला पाचशे रूपयांची लाच मागितल्या प्रकरणी इंदापूर पंचायत समीतीमधील कनिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत महिलेला पुणे येथील लाचलुचपत विभागाने सापळा रचून रंगेहात पकडल्याची घटना इंदापूर पंचायत समिती कार्यालयात घडली असून संबधित महिलेस अटक करण्यात आल्याची माहिती इंदापूर पोलसांनी दिली.
अश्विनी गणेश भोंग (वय३६,कनिष्ठ सहाय्यक) रा.सरस्वतीनगर, क्रीडा संकूल रोड, इंदापूर असे लाच स्विकारणार्या महिला आरोपीचे नाव असून त्या इंदापूर पंचायत समिती येथे कनिष्ठ सहाय्यक या पदावर सरकारी सेवेत आहेत. तर हनुमंत किसन माने (वय ३३) रा. निमगाव केतकी असे फिर्यादीचे नाव आहे. १७ फेब्रुवारी २०२२ रोजी फिर्यादीना आरोपीने घरकुलाचा चेक देण्याच्या मोबदल्यात ५०० रूपये लाचेची मागणी केल्याने याबाबत फीर्यादी यांनी पुणे येथील लाचलुचपत विभागाशी संपर्क करून तक्रार दाखल केली होती.
१८ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारास इंदापूर पंचायत समीती कार्यालयात ५०० रूपयांची लाच स्विकारताना पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधीत विभागाने सापळा रचून संबधीत महिलेवर कारवाई केल्याचे फीर्यादीत म्हटले असून पुढील तपास पूणे लाचलुचपत विभागाचे पोलीस निरिक्षक शिंदे हे करत आहेत.