पुणे : राज्यात २ मे २०१२ नंतर झालेल्या भरती झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना मान्यता द्यावी, विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान द्यावे आदी मागण्यांसाठी शिक्षकांनी आज (शुक्रवार) एक दिवसाचा संप पुकारला आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु असल्याने काही महाविद्यालयात आज नियोजित करण्यात आलेल्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.
राज्य शासनाने २ मे २०१२ पासून शिक्षक भरती बंद ठेवली आहे. अत्यावश्यक बाब म्हणून अनेक ठिकाणी त्यानंतर शिक्षक भरती करण्यात आली आहे. त्या शिक्षकांच्या भरतीला मंजुरी द्यावी. विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचे अनुदान सुरु करावे आदी मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेकडून सातत्याने आंदोलन करण्यात येत आहे. त्याचच एक भाग म्हणून आजचा संप पुकारण्यात आला आहे.
शासनाने या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास पुढील काळात उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकण्यात येईल, असे पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संतोष पाचगे यांनी सांगितले. सरचिटणीस एस टी पवार, कार्याध्यक्ष एम एस शहापूरे, उपाध्यक्ष किरण खाजेकर, तुकाराम साळुंखे यावेळी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांचे कामकाज आज बंद राहिल्याचे त्यांनी सांगितले.