पिंपरी : लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईत दोन देशी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसांसह आकाश श्रीकांत रांजणे (वय २०, रा. मंगलमूर्ती वाडा, चिंचवडगाव) या तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी दुपारी काळेवाडी येथील नवीन पुलाजवळ सापळा रचून करण्यात आली. आरोपीकडून १ लाख ७० हजार रुपये किंंमतीची दोन पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पिंपरी पोलीस ठाण्याचे हवालदार शाकीर जिनेडी यांना काळेवाडी पुलाशेजारील पवनेश्वर चहा स्टॉलच्या जवळ आकाश येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. चहाच्या स्टॉलवर आल्यानंतर पोलीस त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे दोन पिस्तुले आणि काडतुसे आढळली. (प्रतिनिधी) धमकीप्रकरणी गुन्हा दाखल देऊळगावराजे : काळेवाडी (ता. दौंड) येथील दादा गायकवाड यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सर्जेराव गायकवाड, हनुमंत गायकवाड, शंतनू गायकवाड यांच्यावर गुन्हा नोंद केल्याची माहिती ठाणे अंमलदार तात्यासाहेब ढवळे यांनी दिली. गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार सर्जेराव गायकवाड यांची शेती खरेदी करुन देतो असे म्हणून ६ लाख रुपये घेऊनही शेती खरेदी करुन दिली नाही. त्यावर बोलत असताना आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली. (वार्ताहर)
दोन पिस्तुलांसह तरुणाला अटक
By admin | Published: May 16, 2014 4:36 AM