रामदास डोंबे । लोकमत न्यूज नेटवर्कखोर : कायमस्वरूपी दुष्काळी भागांना सिंचनक्षेत्राला वरदान ठरणारी पुरंदर उपसा सिंचन व जनाई-शिरसाई सिंचन योजना दौंड, पुरंदर आणि बारामती तालुक्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून आघाडी सरकारच्या काळात कार्यान्वित झाली. या योजनेमुळे सिंचनाच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटेल, अशी आशा होती. परंतु, ही योजना कित्येक वर्षांपासून सुरू होऊनसुद्धा दौंडच्या दक्षिणेकडील भागातील गावे अद्यापही या पाण्यापासून वंचित आहे. सरकारचा उदासीनपणा व अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे ही योजनाच कुचकामी ठरली असल्याबाबात नाराजी व्यक्त केली आहे. या योजनेचे पाणी सोडण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत शेतकरीवर्गाने व्यक्त केले आहे. जनाई-शिरसाई सिंचन योजना ही वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावातून बंद पाइपद्वारे उचल पाण्याची योजना आहे. या योजनेचा दौंड तालुक्यातील पडवी, कुसेगाव, रोटी, हिंगणीगाडा, वासुंदे, खोर यासह आदी गावांना या योजनेचा लाभ होतो. परंतु, या वर्षी जनाई - शिरसाई सिंचन योजनेतून उन्हाळा कडेला आला असून शेतकऱ्यांची शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत, तरी या सरकारची व अधिकारी वर्गाची या दोन्ही योजनेतून संबंधित लाभार्थी गावांना पाणी सोडले नाही. पुरंदर उपसा सिंचन योजनेतून (शिंदवणे, ता. हवेली) येथून दौंडच्या दक्षिणेकडील जिरायती भागासाठीच्या खुपटेवाडी फाट्यासाठी जलसंपदा विभागाने कोट्यवधी रुपये खर्चून १९ किमी लांबीची बंदिस्त जलवाहिनी टाकली आहे. या जलवाहिनीद्वारे डाळिंब, बोरीऐंदी, ताम्हाणवाडी, दरेकरवाडी, भरतगाव, कासुर्डी, यवत, भांडगाव, वाखारी या गावांचे पाझर तलाव, नाले उन्हाळ्यामध्ये पाण्याने भरण्याची योजना आहे. परंतु, या योजनेचे कामे पूर्ण होऊन पाच वर्षे झाली, तरी या गावच्या शेतकऱ्यांना या खुपटेवाडी फाट्याच्या पाण्याचा लाभ मिळाला नाही. अनेकवेळा संबंधित गावच्या शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी अधिकारी व नेत्यांकडे करूनही याची दाखल घेतली गेली नाही.
दौंडसाठी जनाई-शिरसाई, पुरंदर उपसा ठरताहेत कुचकामी
By admin | Published: May 22, 2017 6:38 AM