सचिन कांकरिया, नारायणगावजुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सात गटांपैकी चार गटांवर राष्ट्रवादी काँग्रेसने, तर तीन गटांवर शिवसेनेने वर्चस्व मिळविले़ या निवडणुकीत काँग्रेस आयला एका जागेचा फटका, तर शिवसेनेला दोन जागांचा फटका बसला आहे़ मतदारांनी एक विद्यमान जि़ प. सदस्य व तीन माजी जि.प. सदस्य यांना जिल्हा परिषदेसाठी निवडून दिलेले आहे़ तीन माजी सदस्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला़ तर, पंचायत समिती गणात शिवसेनेने चौदापैकी सात गणांत वर्चस्व मिळविले व राष्ट्रवादीने सहा जागा मिळविल्या आणि काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने पंचायत समितीवर सत्ता मिळविली होती़ या वेळीदेखील काँग्रेसच्या मदतीने पंचायत समितीवर भगवा फडकवावा लागणार आहे़ निवडणुकीत सहभाग घेऊन प्रथम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवून प्रतिष्ठा पणाला लावणारे आमदार शरद सोनवणे यांच्या आपला माणूस आपली आघाडीला एकही जागा मिळाली नाही़ या आघाडीला सर्वच गटांत तिसरे स्थान मिळाले आहे़ संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या पिंपळवंडी-आळे गटात राष्ट्रवादीचे उमेदवार शरद लेंडे यांना अवघ्या एका मताने विजय मिळाला़ विद्यमान जि. प. सदस्या आशाताई बुचके, माजी जि. प. उपाध्यक्ष पांडुरंग पवार, माजी जि़ प़ अध्यक्ष देवराम लांडे, माजी जि़ प़ उपाध्यक्ष शरद लेंडे या चार सदस्यांना पुन्हा जिल्हा परिषदेत स्थान मिळाले आहे़ तर, माजी जि.प. सदस्या राजश्री बोरकर, भाऊ देवाडे व राजाभाऊ गुंजाळ यांना पराभव स्वीकारावा लागला़ शिवसेनेकडे असलेला पिंपळगाव-डिंगोरे गट हा गट पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले आहे़ गेल्या निवडणुकीत शिवसेनेकडे असलेला ओतूर-पिंपरी पेंढार गट राष्ट्रवादीने पुन्हा आपल्या ताब्यात मिळविला असून, या गट व गणातील सर्व जागा राष्ट्रवादीने घेतल्या आहेत़ हा गट आमदार सोनवणे यांनी प्रतिष्ठेचा केला होता; परंतु मतदारांनी आपला माणूस आपली आघाडी यांच्या उमेदवारांना नाकारले आहे़ आळे-पिंपळवंडी या गटातील लढत संपूर्ण जिल्ह्यात लक्षवेधी ठरली होती. या गटाकडे सर्वांचे लक्ष लागले होते़ या गटात माजी जि़प़ उपाध्यक्ष शरद लेंडे हे राष्ट्रवादीकडून, तर शिवसेनेकडून मंगेश काकडे आणि आपला माणूस आपली आघाडीकडून आमदार सोनवणे यांचे बंधू शशिकांत सोनवणे हे निवडणूक रिंगणात होते़ अत्यंत चुरशीच्या लढतीत टपाली मतांमुळे लेंडे हे अवघ्या एका मताने विजयी ठरले़ राष्ट्रवादीकडे असलेला राजुरी-बेल्हे गट राष्ट्रवादीने आपल्याकडे कायम ठेवला.
जुन्नरमध्ये शिवसेनेला काँग्रेसचा ‘हात’?
By admin | Published: February 25, 2017 2:14 AM