लोकमत न्यूज नेटवर्कजुन्नर : जुन्नर शहरातून जाणारे राज्यमार्ग जुन्नर नगरपालिकेकडे हस्तांतरण करण्याच्या विषयाचा समावेश असलेली नगरपालिकेची विशेष सभा रद्द करण्यात आली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने बंद असलेली दारूची दुकाने पुन्हा सुरू करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर ‘आपला माणुस,आपली आघाडी’च्या नगरसेवकांनी या निर्णयाला विरोध करत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. वाढत्या विरोधामुळे नगरपालिकेने विशेष सभा रद्द केली. दारू दुकाने सुरू करण्यासाठी राज्य महामार्ग नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी गुरुवारी जुन्नर नगरपालिकेने विशेष सभेचे आयोजन केले होते. या ठरावाला विरोध करण्यासाठी तसेच शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ ‘आपला माणुस, आपली आघाडी’चे गटनेते जमीर कागदी यांच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या नगरसेविकांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. जुन्नर नगरपालिका कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या उपोषण आंदोलनात नगरसेविका हाजरा इनामदार, सना पिंजारी, कविता गुंजाळ सहभागी झाल्या होत्या. जैन श्रावक संघ कादरिया वेलफेअर, अंजुमन या मुर्तझा, संकल्प बहुउद्देशिय संस्था, युवक काँग्रेस यांच्या वतीने उपोषनाला पाठिंबा देण्यात आल्याचा दावा जमीर कागदी यांनी केला. विरोधकांनी केलेले उपोषण हा पूर्णपणे राजकीय स्टंट आहे. याबाबत फक्त विषयपत्रिकेवर विषय घेतला होता. सभागृहात विषय मांडला म्हणजे तो मंजूर केला, असे नाही. सभागृहात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ‘आपला माणूस आपली आघाडी’ यांच्या सर्व सदस्यांशी समाधानकारक चर्चा केल्यानंतरच विषय मंजूर वा नामंजूर करण्याचा प्रस्ताव होता. सर्व सदस्यांची मते जाणून घेतली जाणार होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांच्या संदर्भात प्रशासकीय माहिती मागितली होती. ही माहिती वेळेवर न मिळाल्याने सदरची विशेष सभा रद्द करण्यात आली. नागरिकांची कोणतीही दिशाभूल करण्याचा मानस नव्हता. - शाम पांडे, नगराध्यक्षउपोषणाची दखल घ्यावी लागल्यानेच आजची सभा रद्द करावी लागली आहे. यापुढील काळात याबाबत चुकीचा निर्णय घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल व गरज पडली तर न्यायालयाचा पर्यायदेखील खुला आहे. शिवजन्मभूमीमध्ये शंभर टक्के दारूबंदी होण्याबाबत आमची काळात आग्रही भूमिका राहणार आहे.-जमीर कागदी, गटनेते, आपला माणूस आपली आघाडीजुन्नर शहरातून जाणारा राज्यमार्ग तसेच काही रस्ते जे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहेत ते रस्ते नगरपालिकडे हस्तांतरित करून राज्यमार्ग रस्त्याच्या ५०० मीटरच्या नियमाला पळवाट करून बंद असलेली दारूची दुकाने चालू करण्याचा विडा काही नगरसेवकांनी उचलला आहे, असा आरोप कागदी यांनी केला होता. नगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील रस्त्याचा देखभाल विकास करणे नगरपालिकेला शक्य नाही, असेही कागदी यांनी सांगितले.
राज्यमार्ग हस्तांतरणासाठी जुन्नरला नगरसेवकांचे उपोषण
By admin | Published: May 05, 2017 11:59 PM