जुन्नर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जुन्नर तालुक्यात सरासरी ६८ टक्के मतदान झाले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार ५७.४२ टक्के मतदान झाले होते. मतदान संपल्यावर जवळपास २ लाख ६३ हजार २१९ मतदारांपैकी १ लाख ८५ हजार १४४ मतदारांनी मतदान केले होते. जिल्हा परिषदेसाठी ७ जागांसाठी ३९ उमेदवार, तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ६९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तालुक्यात सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, शरद लेंडे, जि.प. शिवसेना गटनेत्या आशाताई बुचके, माजी पंचायत समिती सभापती राजाभाऊ गुंजाळ, पंचायत समिती सदस्य भाऊसाो देवाडे, जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा राजश्री बोरकर यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.आदिवासी भागातील पाडळी-निरगुडे गटात मतदानासाठी मोठा उत्साह दिसून आला. याच गटात जुन्नरलगतच्या बारव येथील प्रामुख्याने शासकीय नोकरवर्गाचा समावेश असणाऱ्या सुशिक्षित मतदार असलेल्या गावात मात्र मतदानासाठी मतदारांचा निरुत्साह दिसून आला. २,२०० मतदारांपैकी अवघ्या ८५१ मतदारांनी मतदान केले. धालेवाडीतर्फे हवेली -सावरगाव गटात मोठी चुरस असल्याने मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते सक्रिय झाले होते. काले, दातखिळेवाडी येनेरे, सावरगाव, वडज, पारूनडे, वैष्णवधाम शिरोली, आमरापूर, आदी गावांमध्ये सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या.
जुन्नरला मातब्बरांचे भवितव्य मतपेटीत बंद
By admin | Published: February 22, 2017 1:53 AM