लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : जानेवारी-फेब्रुवारी २०२१ या कालावधीत जुन्नर तालुक्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने ८० लाख ७२ हजार रुपये मंजूर केले आहेत, अशी माहिती जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी दिली आहे .
बेनके म्हणाले, ७ ते ९ जानेवारी २०२१ आणि १८ आणि १९ फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जुन्नर तालुक्यातील १८ गावांमध्ये द्राक्ष पिकांसह गहू, मका, भाजीपाला कांदा, बाजरी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यामध्ये तालुक्यातील ५५० शेतकऱ्यांना फटका बसला. शासनाने दिलेल्या आदेशानुसार महसूल व कृषी विभागाने ४५३ हेक्टर ५९ आर बाधित क्षेत्राचे पंचनामे करून त्याबाबत नुकसानभरपाईची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शासनाने ५५० बाधित शेतकऱ्यांना ८० लाख ७२ हजार रुपये नुकसानभरपाई पोटी मंजूर केले. जिल्हाधिकारी कार्यालयाने हा निधी जुन्नर तहसील कार्यालयाकडे वर्ग केला आहे. लवकरच बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा होतील, अशी माहिती बेनके यांनी दिली.
फोटो - अतुल बेनके