जुन्नर - शिवरायांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्याचे नाव शिवनेर असल्याच्या नोंदी मोडी लिपीतील जुन्या दस्ताऐवजात आढळल्या आहे. जुन्नर येथील बुट्टे पाटील कुटुंबीयांच्या मूळ मढ गावातील जमिनीचे सन १८२६ मधील मोडी लिपीतील व ब्रिटिश सरकारने नेमलेल्या इनाम कमिशनने अधिकृत केलेल्या जमिनीची दुर्मिळ कागदपत्रे सापडली असून, या कागदपत्रांमध्ये तालुक्याचे नाव शिवनेर असल्याचे संदर्भ आढळले आहेत.शिवाजीमहाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक जुन्नर तालुक्यात पुरातन गोष्टीवर संशोधन सुरू आहे. यासाठी ब्रिटिश शासनाने इनाम कमिशन नेमले होते. जुन्नर येथील बुट्टे पाटील कुटुंबीयांच्या मूळ मढ गावातील जमिनीचे सन १८२६ मधील मोडी लिपीतील व ब्रिटिश सरकारने नेमलेल्या इनाम कमिशनने अधिकृत केलेल्या जमिनीची मोडी लिपीतील दुर्मीळ कागदपत्रे नुकतीच आढळली. या कागदपत्रांमध्ये जुन्नरचे नाव शिवनेर असल्याचे संदर्भ आहेत.पुणे पुरालेखागार म्हणजेच यापूर्वी छत्रपती व पेशवे दप्तर यामध्ये इनाम दिल्या गेलेल्या जमिनीची व त्याची मालकीच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी इनाम कमिशनची नेमणूक १८१८ मध्ये पेशवाई खालसा झाल्यावर केली गेली. हे इनाम व वतन अन्य स्वरूपाच्या मोडी लिपीतील व तसेच पर्शियन भाषेतील इस्लामिक कालगणनेप्रमाणे कागदपत्र सत्यता पाहून इनाम कायम करण्यात आली. ही जमीन हरजी, जीवनाजी, लक्ष्मण कृष्णाजी, बगाजी व देवजी बुट्टे यांच्या इनाम जमिनीच्या कागदपत्रात जुन्नरचा उल्लेख शिवनेर असा आहे.जुन्नरपासून जवळच असलेल्या धामणखेल गावातील खंडोबा मंदिराच्या इनाम जमिनीच्या संदर्भातील मोडी लिपीतील काही दस्ताऐवजातदेखील शिवनेर असा तालुक्याचा उल्लेख सापडला आहे. धामनखेल येथील मार्तंड खंडेराय देवस्थांसाठी तत्कालीन वहीवाटदार बाळाजी, गंगाजी, बहिर्जी, खंडोजी यांनी जमीन इनाम दिली होती.या इनामी जमिनी संदर्भातील मोडी लिपीतील सनदेत सुरूतारीख १५ माहे, एप्रिल सन १८५३ इ. मुक्काम शहर जुन्नर, ता. शिवनेर असा उल्लेख आहे. सनदेत तत्कालीन मामलेदार राघवेंद्रराव नरसिंह यांच्या सहीखाली तालुका शिवनेर असा उल्लेख आहे.ब्रिटिश राजवटीत या मोडी भाषेतील दस्ताएवजाचे रूपांतर इंग्रजी भाषेत केले गेले. यात तालुक्याचे नाव व जिल्हा या रकान्यात तालुका शिवनेर, जिल्हा पुणे, १८ नोव्हेंबर १८६१ असा उल्लेख केलेला आहे.तत्कालीन राज्यपाल मुंबई यांच्या वतीने लेखनिक जॉर्ज रसेल यांच्या सहीने हा दस्तऐवज प्रमाणित केला गेला आहे. याबाबत मोडी लिपीतील कागदपत्रे संग्राहक अॅड. राजेंद्र बुट्टे पाटील यांच्या संग्रहात आहेत.प्राचीन सातवाहन काळात, तसेच पुढे ऐतिहासिक काळात जुन्नर हे महत्त्वाचे ठाणे होते. जुन्नर हे मध्यवर्ती ठिकाण आहेतालुक्याचा प्रशासकीय कारभार जुन्नरमधूनचालत असल्याने जुन्नर तालुका हे नाव प्रचलित झाले असावे. या नंतर ब्रिटिश प्रशासन व्यवस्थेत तालुका जुन्नर असे रूढ झाले असावे.
जुन्नर तालुक्याचे ऐतिहासिक नाव शिवनेर, दस्ताऐवज सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 3:06 AM