Junnar Vidhan Sabha Election Result 2024: जुन्नरमध्ये अपक्ष जिंकला; युती-आघाडीचे उमेदवार कुठं कमी पडले, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 03:11 PM2024-11-24T15:11:13+5:302024-11-24T15:12:36+5:30

Junnar Assembly Election 2024 Result सुरुवातीला अतुल बेनके व सत्यशील शेरकर या दोघात लढत होईल, असे वाटत असतानाच जनतेने शरद सोनवणे यांना साथ दिली 

Junnar Vidhan Sabha Election Result 2024 Independent won in Junnar Where did the candidates of mahayuti mahavikas aghadi fall short, what exactly happened? | Junnar Vidhan Sabha Election Result 2024: जुन्नरमध्ये अपक्ष जिंकला; युती-आघाडीचे उमेदवार कुठं कमी पडले, नेमकं काय घडलं?

Junnar Vidhan Sabha Election Result 2024: जुन्नरमध्ये अपक्ष जिंकला; युती-आघाडीचे उमेदवार कुठं कमी पडले, नेमकं काय घडलं?

Junnar Vidhan Sabha Election Result 2024 : जुन्नर विधानसभा निवडणुकीत झालेल्या पंचरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार अतुल बेनके व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सत्यशील शेरकर या अधिकृत पक्षाच्या उमेदवारांना अपक्ष उमेदवार माजी आमदार शरद सोनवणे यांनी पराभवाचे आस्मान  दाखवले आहे. या अधिकृत पक्षाच्या उमेदवारांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ जुन्नरमधील जनतेने आणली. सुरुवातीला अतुल बेनके व सत्यशील शेरकर या दोघात लढत होईल, असे वाटत असतानाच जनतेने निवडणूक हाती घेतल्याने शरद सोनवणे यांच्या गळ्यात विजयमाला पडली.

पंचरंगी लढतीत वंचित आघाडीचे देवराम लांडे, आशाताई बुचके या उमेदवारांना मिळालेल्या मतांमुळे मोठ्या प्रमाणात मतविभागणी होऊन लढतीचे चित्रच बदलले. शरद सोनवणे यांना ७३,३५५ मते मिळाली तर सत्यशील शेरकर, अतुल बेनके, देवराम लांडे, आशाताई बुचके यांना मिळालेल्या मतांची एकत्रित बेरीज १,४६,५२७ भरली.

वंचित आघाडीचे उमेदवार देवराम लांडे यांनी प्रामुख्याने त्यांचा बालेकिल्ला असलेल्या आदिवासी भागात जोर लावल्याने त्यांना मिळालेल्या २२,४०१ मतांचा फटका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसला. या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार अतुल बेनके ३,३०० कोटी रुपयांची केलेली विकासकामांच्या प्रचारामुळे आघाडीवर होते. परंतु महायुतीत झालेली बंडखोरी, शरद पवार यांना सोडून अजित पवार यांना दिलेली साथ, देवराम लांडे यांच्या उमेदवारीमुळे दुरावलेला पारंपरिक आदिवासी मतदार, यामुळे त्यांच्यासमोर आवाहन निर्माण झाले होते. परंतु लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळेल या त्यांच्या आशेवर मतदारांनी पाणी फिरवले. मोठ्या प्रमाणात असलेले कार्यकर्त्यांचे जाळे, अजित पवार यांना मानणारा वर्ग यामुळे मतांची कमतरता भरून निघेल, असा आशावाद बेनके यांना होता तो फोल ठरला. सत्यशील शेरकर यांनी चुरशीच्या लढतीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. मात्र तर शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग, आघाडीतील सहकारी पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गटाची मिळालेली साथ, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे सभासद, काँग्रेसची पारंपरिक व्होटबँक यामुळे शेरकरांचे पारडे जड असल्याचा दावा समर्थक करत होते. परंतु शरद सोनवणे यांचा झंझावाता पुढे ते कमी पडले.                       

सुरुवातीला दोनच प्रमुख पक्षांचे उमेदवारांमध्ये होत असलेल्या लढतीत मात्र अपक्ष उमेदवार माजी आमदार शरद सोनवणे यांनी रंगत आणली. सोनवणे यांच्या संदर्भातील वादग्रस्त व्हिडिओ, सोनवणे यांची मते खाण्यासाठी उभे केलेले दोन डमी उमेदवार यांची त्यांना मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळाली. मोठा जनसंपर्क, तसेच कोणताही मोठा नेता नसताना सोनवणे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेला सर्वसामान्य जनतेची असलेली मोठी उपस्थिती यामुळे सोनवणे यांनी अखेरच्या टप्प्यात जोरदार मुसंडी मारली. सहानुभूतीचे रूपांतर मतांमध्ये करून घेण्यात शरद सोनवणे यशस्वी झाले.                         

तालुक्याच्या सर्वच भागात शरद सोनवणे यांनी सातत्यपूर्ण मते मिळवीत शेरकर व बेनके यांच्या आशा धुळीस मिळविल्या.तर आदिवासी भागात आदिवासी समाजाच्या मतांवर तसेच वंचित आघाडीची मते काही प्रमाणात देवराम लांडे यांना मिळाली. परंतु ते स्पर्धेत येऊ शकले नाही. तर अपक्ष उमेदवार आशाताई बुचके यांनादेखील मानणारा मोठा वर्ग तालुक्यात होता. मागील निवडणुकीत जवळपास ५२ हजार मते मिळविणाऱ्या आशाताई बुचके या निवडणुकीत आपला करिष्मा दाखवण्यात अपयशी ठरल्या.             

सत्यशील शेरकर यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी घेतलेली सभा, तसेच अतुल बेनके यांच्या प्रचारासाठी घेतलेली अजित पवार यांची सभा याचा मात्र मतदारांवर कोणताही प्रभाव पडला नाही. एकूणच कोणताही मोठा नेता सोबत नसताना सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली शरद सोनवणे यांची निवडणूक, तसेच पंचरंगी लढतीमुळे झालेले मत विभाजन शरद सोनवणे यांच्या पथ्यावर पडले आणि जुन्नर तालुक्यातील पहिला अपक्ष आमदार होण्याचा इतिहास शरद सोनवणे यांना घडविता आला.

Web Title: Junnar Vidhan Sabha Election Result 2024 Independent won in Junnar Where did the candidates of mahayuti mahavikas aghadi fall short, what exactly happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.