नारायणगाव : जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचेआमदार अतुल बेनके यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.त्यांना पुढील उपचारासाठी चाकण येथील युनिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे,अशी माहिती आमदार बेनके यांच्या सचिवांनी दिली आहे .
नारायणगाव येथे बुधवारी (दि.२६) कोविड -१९ उपाययोजना संदर्भात आयोजित आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ,पोलीस अधीक्षक संदीप पाटील, प्रांताधिकारी सौरभ कोडोलकर, पोलीस उपअधीक्षक दीपाली खन्ना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नांदापुरकर , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार ,तहसीलदार हनुमंत कोळेकर ,जुन्नरचे मुख्याधिकारी मछिंद्र घोलप ,सभापती विशाल तांबे ,गट विकास आधिकारी हेमंत गरीबे , कुकडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर,आरोग्य आधिकारी डॉ. उमेश गोडे ,डॉ वर्षा गुंजाळ आदी अनेक प्रशासकीय आधिकारी उपस्थित होते. गुरुवारी (दि.२७) त्यांना त्रास झाल्याने पुण्यात कोरोनाची तपासणी केली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अधिकारी वर्गाचे धाबे दणाणले आहे.
नारायणगाव येथील हॉटेल ओसरा येथे १३ ऑगस्ट रोजी झालेला विवाह सोहळ्यास बेनके यांनी उपस्थिती दर्शविली होती. या विवाह सोहळ्यातील २३ जण गेल्या तीन दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
संपर्कात आलेल्यांनी आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन आमदार बेनके यांनी केले आहे .