राजू इनामदार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत पिकणारा आंबा ‘शिवनेरी हापूस’ या ‘ब्रँड’ने बाजारात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी यात रस घेतल्याने जिल्हा कृषी विभागाने त्यासाठीची मोहीम सुरू केली आहे.
या आंब्यांचे पेटंट घेण्याचे आदेश पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील आंब्यांची झाडे मोजण्यापासून ते त्यांचे भौगोलिक स्थान निश्चित करण्यापर्यंतच्या आवश्यक गोष्टी केल्या जात आहेत.
या आंब्याचे उत्पादन होणाऱ्या परिसराचा भौगौलिक नकाशा तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या आंब्यांच्या नव्या व जुन्या लागवड झाडांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक झाडाची नोंद, त्याचे वय, कोणत्या वर्षी किती उत्पन्न, मागील वीस वर्षांतील पावसाची आकडेवारी ही माहिती झाडाच्या मालकांना नाव पत्ता, मोबाईल क्रमांकासह जमा करायची आहे.
आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे गावनिहाय गट स्थापन करून त्यांची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात येईल. या आंब्याचे खरेदीदार, कोणत्या बाजारात तो जास्त विकला जात होता तेथील व्यापाऱ्यांची माहिती, आंबा खाणाऱ्या ग्राहकांची माहिती, त्यांचे अनुभव याचीही नोंद कृषी विभाग करणार आहे. नारायणगावातील कृषी विज्ञान केंद्राला या आंब्याचे, जमिनीचे, मातीचे, भौतिक व रासायनिक विश्लेषण करण्यास सांगण्यात आले आहे. देवगड, रत्नागिरी, दापोली या भागांतील हापूस आंब्यांबरोबर ‘शिवनेरी हापूस’चा तुलनात्मक अभ्यास केला जाणार आहे.
चौकट
शिवनेरी हापूस ब्रँड व्हावा
“जुन्नर, आंबेगावातील आंबा विशेष आहे, पण त्याचे वैशिष्ट्य सिद्ध करण्याच्या फंदात आजपर्यंत कोणी पडले नव्हते. आता त्याचे महत्त्व शास्त्रशुद्ध पद्धतीने सिद्ध होईल. शिवनेरी हापूस हा ब्रँड व्हावा, त्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करणार आहे.”
-ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा कृषी अधिकारी.