जेजुरी: तीर्थक्षेत्र जेजुरीच्या ३४९ कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. या आराखड्याच्या माध्यमातून तीन टप्प्यांत विकासकामे होणार आहे. विकास आराखड्यात समाविष्ट कामे आणि नव्याने सूचना हरकती मागवण्यात आल्या असून, त्याचीही दखल घेण्यात येईल. सर्वांनी विकास आराखड्यातील कामांना सहकार्य करावे, असे आवाहन आमदार संजय जगताप यांनी केले.
तीर्थक्षेत्र जेजुरीचा ३४९ कोटींचा विकास आराखड्याबाबत पुरंदर हवेलीचे आ. संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात बैठक घेण्यात आली होती. बैठकीला पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत, नगराध्यक्षा वीणा सोनवणे, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, मुख्याधिकारी पूनम शिंदे, मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे, विश्वस्त राजकुमार लोढा, शिवराज झगडे, संदीप जगताप, प्रसाद शिंदे, अशोक संकपाळ, तुषार सहाणे, नगरसेवक सचिन सोनवणे, बाळासाहेब दरेकर, बाळासाहेब सातभाई, नगरसेविका रुक्मिणी जगताप, अलीम बागवान, अजिंक्य देशमुख, गणेश शिंदे, आदी उपस्थित होते.
आमदार जगताप यांनी या विकास आराखड्यातून होणाऱ्या विकासकामांची माहिती ग्रामस्थांना दिली. विकास आराखड्यात समाविष्ट कामे आणि नव्याने सूचना हरकती मागवण्यात आल्या. आराखड्याबाबत चर्चा करण्यात आली. आराखड्याची तीन टप्प्यांत कामे होणार असून पहिल्या टप्प्यात खंडोबागड आणि कडेपठार मंदिर परिसरातील लहान मोठी मंदिरे, पायरीमार्ग, जेजुरीगडाची पहिली पायरी ते शिखरापर्यंत डागडुजी, दीपमाळा, कमानी आदी कामे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात शहरातील मुख्य बाजारपेठा, महाद्वार पथ, शहरांतर्गत पालखी मार्ग, सुलभ शौचालये, विद्युतीकरण आदी कामे तर तिसऱ्या टप्प्यात कऱ्हा स्नान घाट, स्नानाला जाणारा पालखीमार्ग, होळकर आणि पेशवे तलाव दुरुस्ती व सुशोभीकरण, कडेपठार मंदिर मार्ग आदी विकासकामे केली जाणार आहेत.
ग्रामस्थांतून मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त संदीप जगताप, राजेंद्र पेशवे, नितीन कदम, सचिन पेशवे, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, मेहबूबभाई पानसरे, मंगेश घोणे, दादा जगताप, अरुण खोमणे, रवींद्र नवगिरे, महमदभाई पानसरे, सोमनाथ उबाळे नगरसेवक अलीम बागवान आदींनी सूचना मांडल्या. त्यांनी सुचवलेली कामे ही आराखड्यात घेण्यात येतील, असे आश्वासनही आमदार जगताप यांनी दिले.
२४ जेजुरी २
जेजुरी विकास आराखड्यासंदर्भात झालेल्या बैठकीला मार्गदर्शन करताना संजय जगताप.