पुणे : अगदी एक महिन्यापूर्वी संपूर्ण कुटुंब एकत्र होते. एकत्र भेटले, जेवले. पण आज मात्र त्यांच्या आठवणी राहिल्या आहेत... अरुण गायकवाड सांगत होते.. त्यांनी जवळपास पंधरा दिवस केलेली धडपड त्यांच्या डोळ्यांसमोरून जात होती. जाधव कुटुंबातील चौघांचा गेल्या १५ दिवसांत कोरोनाने मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी अगदी हसतं खेळतं असणारं हे कुटुंब आज होतं असं म्हणायची वेळ आली आहे. अरुण यांची पत्नी वैशाली गायकवाड, वैशाली यांचे दोन्ही भाऊ आणि आई चौघंही पंधरा दिवसांच्या फरकाने मृत्युमुखी पडले आहेत.
वैशाली यांचे वडील १५ जानेवारीला गेले. त्यानंतर दोन महिन्यांनी पूजेच्या निमित्ताने हे कुटुंब एकत्र आले. त्यानंतरच कुटुंबातील एकानंतर एक -एक जण पॅाझिटिव्ह यायला सुरुवात झाली. पहिल्यांदा पॅाझिटिव्ह आला तो धाकटा भाऊ ३८ वर्षांचा रोहित जाधव. त्यापाठोपाठ एक एक करत इतर सगळेच पॅाझिटिव्ह आले. पॅाझिटिव्ह झालेल्या या सगळ्यांना ॲडमिट करायची वेळ आली तेव्हा मात्र प्रचंड धावपळ करावी लागणे साहजिकच होते.
रोहित जाधवांना बाणेर कोविड सेंटरला ॲडमिट केले. दुसरा भाऊ चाळीस वर्षांचा अतुल कोथरुडच्या खासगी रुग्णालयात. वैशालींची आई अलका जाधव विश्रांतवाडीच्या रुग्णालयात दाखल होत्या. २८ तारखेला वैशाली यांना त्रास व्हायला लागला तेव्हा तर अतुल यांना आणखी प्रचंड धावपळ करावी लागली.
“ वैशालीची ॲाक्सिजन पातळी कमी होती. त्यामुळे मी तिला घेऊन आधी भारती हॅास्पिटलला गेलो. तिकडे बेड मिळाला नाही म्हणून रुबीला गेलो. शेवटी ॲम्ब्युलन्समधला ॲाक्सिजन संपत आला तेव्हा ड्रायव्हरने मदत केली आणि आम्ही तिला खेड शिवापूरच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे एक दिवस ठेवलं. प्रकृती सुधारतेय असं वाटतानाच दुर्दैवाने ३० मार्चला ती गेली,” अरुण गायकवाड सांगत होते.
गायकवाड यांच्या आई आणि मुलांनाही कोरोनाची लागण झाली होती. घरातले सगळेच पॅाझिटिव्ह असताना धावपळ करणारे ते एकटेच उरले होते. “ एकीकडे गेलेल्यांचे अंत्यसंस्कार दुसरीकडे उरलेल्यांसाठी औषध मिळवणे अशी दुहेरी कसरत सुरु होती. मेव्हण्यासाठी रेमडेसिविर मिळवायला तर तीन दिवस प्रचंड फिरलो. ब्लॅकने औषधं मिळवली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.”
३ एप्रिलला रोहित शंकर जाधव (वय ३८) गेले. ४ एप्रिलला त्यांची आई अलका शंकर जाधव (वय ६२) यांचे निधन झाले. तर १४ एप्रिलला ४० वर्षांच्या अतुल शंकर जाधव यांचाही मृत्यू झाला. आता मागे उरले आहेत ती रोहित आणि अतुल यांच्या पत्नी आणि मुलं. घरातले सगळे गेले, आधार नाही, अशात आता पुढे काय, असा प्रश्न आज त्या संपूर्ण कुटुंबासमोर आहे. जाधवांचे संपूर्ण कुटुंब कोरोनाने केवळ ४५ दिवसांत उद्ध्वस्त केलंय.