इंदापूर पोलिसांची कामगिरी
बाभूळगाव :अवघ्या २४ तासांत इंदापूर पोलिसांनी कंटेनर व त्यातील १६ लाख, ८६ हजार, ५० रुपये किमतीच्या फ्रिजचोरीचा पर्दाफाश केला.
रांजणगाव एमआयडीसी येथून व्हर्लपूल कंपनीचे फ्रिज पाँडेचरी येथे घेऊन जात असताना पुणे सोलापूर हायवेवरील इंदापूरनजक चालकाने कंटेनर उभा केला होता. गाडीतून खाली उतरून रस्त्याच्या बाजूला प्रातर्विधीसाठी गेला असता अज्ञात चोरट्यांनी कंटेनर मालासह नेला. ही घटना इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोलनाक्यानजीक घडली. याबाबतची फिर्याद चालक अरविंद कुमार सिंग, (वय ३२ रा.बिसब्रापूर, ता. कल्याणपूर, जि. मतिहारी बिहार) याने इंदापूर पोलीस ठाण्यात दिली. कंटेनर (एन.एल.०१, एए ५१७०) या गाडीमध्ये रांजणगाव एमआयडीसी येथून १२९ फ्रिज भरून ते पाँडेचरी या ठिकाणी पोहोचवण्यासाठी सोलापूरच्या दिशेने निघाले होते. दिनांक २५ फेब्रुवारी रोजी चालकाची तब्येत व्यवस्थित नसल्याने ते इंदापूरनजीक सरडेवाडी टोलनाक्याचे पुढे लगत गाडी उभी करून गाडीतच झोपले व दुसऱ्या दिवशी सकाळी (दि.२७) उठून पुणे सोलापूर हायवेने सोलापूर बाजूस तीन चार कि.मी.गेल्यानंतर सकाळी ८:३० वा.चे सुमारास रस्त्याचे कडेला गाडी उभी करून, चालक गाडीतून खाली उतरून प्रातर्विधीसाठी गेला होता. त्या वेळी त्यांचा मोबाईल व कंटेनरची चावी तशीच गाडीत राहिली होती. परत आल्यानंतर त्यांची गाडी उभी केलेल्या ठिकाणी दिसून न आल्याने त्यांने कंन्टेनर व त्यातील १२९ फ्रिज किंमत १६ लाख,८६ हजार,५० रुपये किमतीच्या मालासह चोरी झाल्याबाबतची तक्रार इंदापूर पोलीसात दीली होती.घटनेचे गांभिर्य ओळखुन इंदापूर पोलीस स्टेशन पोलीस निरिक्षक धन्यकुमार गोडसे यांनी पुणे ग्रामीण पो. अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अपर पो. अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पो.अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली शोध घेणेकामी सहायक पो. निरीक्षक अजित जाधव व टी. एस. मोहिते व काही पोलीस कर्मचारी यांचे विशेष पथक तयार करून सोलापूर, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात तपासासाठी पाठवण्यात आले. अज्ञात चोरटा व गुन्ह्यात चोरी गेलेला माल शोध तपास करत असताना तपास पथकाला बार्शी लातूर महामार्गावरील कुसळंब टोलनाक्याचे पुढे काही अंतरावर चोरीस गेलेला कंटेनर हा ९८ फ्रीजसह मिळून आला. तर त्यातील ३१ फ्रिज चोरट्यांनी चोरून नेले होते. सदरचे चोरी गेलेले ३१ फ्रिज हे नाकाबंदीदरम्यान परभणी पोलिसांना मिळून आले. तर सदरची चोरी करणारे आरोपी यांचेबाबतची पूर्ण माहिती इंदापूर पोलिसांना मिळाली आहे. लवकरच आरोपी पोलिसांच्या हाती लागणार असल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली. तर या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरिक्षक अजित जाधव, टी. एस. मोहिते, पो. हवा. दीपक पालखे, सुरेंद्र वाघ, पो.ना.काशिनाथ नागराळे, पो.काॅ. विनोद मोरे, अर्जुन भालसिंग,संजय कोठावळे व तांत्रिक मदतनीस पो.काॅ. सचिन गायकवाड यांचे पथकाने लावला. बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले. पुढील तपास टी. एस. मोहिते हे करत आहेत.
अवघ्या २४ तासांत चोरीस गेलेला ट्रक व त्यातील मालासह बारामती उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलिस निरिक्षक धन्यकुमार गोडसे व पोलीस पथकासह जप्त करण्यात आलेला ट्रक.
०३०३२०२१-बारामती-२०