पुणे : ‘आजकाल विद्यार्थ्यांपासून राजकीय व्यक्तीपर्यंत सर्वजण शाश्वत विकासाच्या (सस्टेनेबल डेव्हलपमेंट) गप्पा मारताना दिसतात. पण, शाश्वत विकास म्हणजे काय, ग्लोबल वॉर्मिंग आणि ग्रीन हाऊस इफेक्ट यांचा संबंध, पृथ्वीवरील गंभीर परिणाम याची तसूभरही माहिती त्यांना नसते. पर्यावरणाच्या सखोल अभ्यासाचा अभाव सर्वत्र पाहायला मिळत आहे. प्रयोगशील जीवनशैैलीतूनच पर्यावरणपूरकतेचे धडे गिरवता येऊ शकतात’, असे मत चौैथ्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. हेमा साने यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.वनस्पतीशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासिका साने यांनी ३८ वर्षांहून अधिक काळ अध्यापनाचे काम केले आहे. पर्यावरण या विषयावर त्यांनी लेखन केले आहे. ‘पर्यावरणस्रेही जीवनशैली’ अवलंबून त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्या म्हणाल्या, ‘आजकाल प्रत्येकाला उच्च दर्जाची जीवनशैली जगायची असते. तंत्रज्ञान पायाशी लोळण घेत असताना सर्व सोयी-सुविधांचा उपभोग घ्यायचा असतो. अशी जीवनशैली जगत असताना पर्यावरणपूरकतेचा पाठपुरावा कसा करता येणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनातून पर्यावरणपूरकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, ‘प्रत्येक विधायक कामाची सुरुवात स्वत:पासून होते. संमेलनाच्या निमित्ताने पर्यावरणपूरकतेकडे एक पाऊल टाकले जाणार असेल, तर ती चांगली बाब आहे. प्रत्येकाने प्रयत्न केल्याशिवाय केवळ पोपटपंची करुन काहीही साध्य होणार नाही.’साने म्हणाल्या, ‘शुध्द पाणी, रिव्हर्स आॅसमॉसिस (आरओ) केलेले पाणी पिण्याची प्रत्येकाला सवय लागली आहे. पण, एका सर्वेक्षणानुसार सर्वात शुध्द पाणी पिणा-यांनाच जास्त आजारांचा सामना करावा लागतो, हे सिध्द झाले आहे. वाहनांचा वापर, शुध्द पाण्याचा अतिरेक, किटकांचा नाश, स्वच्छतेची अतिशयोक्ती यातून शरीराची प्रतिकारक शक्ती कमी होते आणि त्यामुळे विविध आजारांचा प्रादुर्भाव होतो. यातून आपण आपल्या आणि पुढील पिढीतील सक्षमता कमी करत आहोत, हे आजकाल कोणी लक्षात घेत नाही.’ निसर्गाशी जवळीक निर्माण झाली तरच त्याचे महत्व कळू शकेल आणि प्राणीमात्रांबाबत प्रेम निर्माण होईल, हे संदेश डॉ. हेमा साने यांच्या जीवनशैलीतूनच आपोआपच कळतो. (प्रतिनिधी)
शाश्वत विकासाच्या केवळ गप्पाच!
By admin | Published: January 06, 2016 12:30 AM