पुणे : गॅंगस्टर बंडु आंदेकर टोळीला बातम्या देतो, अशा संशयावरुन ओंकार कुडले व त्याच्या साथीदारांनी तरुणावर कोयत्याने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. तसेच हवेत कोयते फिरवत दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलिसांनी ओंकार कुडलेसह तिघांना अटक केली आहे.
राजन मंगशे काळभोर (वय २२, रा. मोहननगर, धनकवडी), ओंकार गजानन कुडले (वय २१, रा. गणेश पेठ), कानिफनाथ विनोद महापूरे (वय २३, रा. डोके तालीम, नाना पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गोट्या माने, शुभम पवळे, आकाश सासवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओंकार कुडले याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सूर्यकांत आंदेकर याला अटक केली आहे. ती घटना २१ फेब्रुवारी रोजी घडली होती. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी डोके तालीमजवळ हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एका १६ वर्षाच्या मुलाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्याचे मित्र घराजवळ थांबलेले असताना ओंकार कुडले व इतर हातात कोयते घेऊन हवेत फिरवत दुचाकीवरुन ट्रिपलसिट आले. कानिफनाथ महापुरे याने हाच तो आद्या उंकरडे तुला आज आम्ही बघतोच, हा सुरज ठोंबरेच्या बातम्या आंदेकर टोळीला देऊन लावालाव्या करतो. तुला आज संपवतोच. सूरजभाऊ ठोंबरेनी याला संपवायला सांगितले आहे, असे म्हणून फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. तसेच इतरांनी हातातील कोयते हवेत उंचावून मोठ मोठ्याने सूरज भाई का राज आनेवाला है, असे ओरड व शिवीगाळ करीत लोकांच्या मनात दहशत निर्माण केली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करुन आरोपी रहात असलेल्या ठिकाणी छापे घालून तिघांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे. पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते अधिक तपास करीत आहेत.
गुन्हेगार कायदा हातात घेईल तर कडक कारवाई
सूर्यकांत ऊर्फ बंडुआंदेकर, ओंकार कुडले याच्या अटकेविषयी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, अशा प्रकारे कोणी कायदा हातात घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करत असेल तर पोलिसांकडून स्वत: हून त्यांची माहिती काढून अशा गुन्हेगारांची गय न करता त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशान्वये अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व निरीक्षक हर्षवर्धन गाडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले व त्यांच्या सहकार्यांनी केली.