पुणे :मुंबई आणि नवी मुंबई महापालिका हद्दीत ५०० स्क्वेअर फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींना मिळकत करामधून पूर्ण सूट दिली आहे. त्याच धर्तीवर पुणे महापालिका हद्दीत ५०० स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मिळकत कर माफ करावा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे केली आहे. रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या महिला तसेच कनिष्ठ मध्यम वर्ग हे प्रामुख्याने ५०० स्क्वेअर फुटांच्या घरांमध्ये राहतात.
पुणे शहराची वाढ होत असताना अनेक उपनगरे, लगतची गावे समाविष्ट झाली आहेत. यात छोट्या मिळकतींचे प्रमाण जास्त आहे. मिळकत कर माफ झाल्यास या वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे, असे मत धंगेकर यांनी सभागृहात व्यक्त केले. पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प ८ हजार कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे मिळकत करात सवलत दिल्यास महापालिकेच्या उत्पन्नात विशेष फरक पडणार नाही. महापालिकेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात गळती आहे. ही गळती रोखणे पुणे महापालिकेला सहजशक्य आहे, असे धंगेकर यांनी सभागृहाला सांगितले.
कर वसुलीसाठी अभय योजना :
पुणे महापालिकेच्या मिळकत कराची थकबाकी सुमारे ८ हजार कोटी रुपये आहे. त्यात पाच हजार कोटींचा दंड आहे. त्यामुळे मिळकत कर वसुलीसाठी अभय योजना राबवावी. महापालिकेने अभय योजना राबविल्यास सुमारे सहा हजार कोटी रूपये विकासकामांसाठी उपलब्ध होणार आहेत, असे आमदार सुनील टिंगरे यांनी विधानसभेत सांगितले.