पुणे : शहरात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रस्त्यांची पुन्हा चाळण झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने उपनगरांमधील रस्त्यांना प्रचंड खड्डे पडले असून, यामुळे नागरिकांची पूर्ण दैना उडाली आहे. यात पहिल्या पावसामध्ये पडलेले खड्डे महापालिकेकडून बुजविण्यात आले असले, तरी त्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडले आहेत.शहरात गेल्या १५-२० दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून, खड्ड्यांमुळे जागो-जागी पाण्याची डबकीच डबकी साचली आहेत. सिमेंट रस्त्यांवरील स्पीडब्रेकर व ड्रेनेजच्या झाकणालगत मोठ-मोठे खड्डे पडल्याने हे रस्तेदेखील प्रचंड धोकादायक झाले आहेत. पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे शहरात अनेक ठिकाणी रस्ते धोकादायक झाले असून, अपघातांची शक्यता वाढली आहे.रस्त्यांवर अत्यंत चुकीच्या पद्धतीने लावण्यात अलेली ड्रेनजची झाकणेदेखील धोकादायक झाली असून, यामुळे सध्या शहरातील सिमेंट रस्ते अपघाताचे सापळे बनले आहेत. शहरात जुलै महिन्यात झालेल्या पावसानंतरदेखील सर्वत्र मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. याबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला होता. त्यानंतर प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम राबवून सर्व खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. परंतु आता पुन्हा एकदा रस्त्यांची चाळण झाली आहे.हडपसर-मुंढवा परिसरात खड्ड्यांमध्ये रस्तासध्या शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांना प्रचंड खड्डे पडले आहेत. काही भागात ही परिस्थिती अधिकच गंभीर असून, हडपसर-मुंढवा परिसरात रस्त्यावर खड्डे नसून, खड्ड्यांमध्ये रस्ते गेले आहेत. हडपसर-मुंढवा प्रभागामध्ये जुलै अखेरपर्यंत तब्बल १८७ खड्डे पडले असून, सर्व खड्डे बुजविण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
वाहने चालवा जरा जपून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 3:50 AM