राजुरी : राजुरी येथील बसस्थानकावर लांब पल्ल्याच्या एसटी बस थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड पडत असून त्यांना बस मिळत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या ठिकाणी सर्व बस थांबवण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्या स्नेहल शेळके यांंनी केली असून, गाड्या न थांबल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. राजुरी (ता. जुन्नर) हे गाव नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर आळेफाटा ते बेल्हा या दोन गावांच्या मधोमध वसलेले आहे. या गावची लोकसंख्या सुमारे सतरा हजारांहून अधिक आहे. तसेच या गावात मोठी विद्यालये आहे. या ठिकाणी विद्यार्थी तसेच पर्यटक दररोज येत असतात. त्यामुळे येथील बसस्थानकावर नेहमीच गर्दी असते. तसेच येथील नोकरदारवर्ग दररोज पुणे, नगर तसेच मुंबई या ठिकाणी जाऊन येऊन करत आहेत. या ठिकाणी बस थांबत नसल्याने त्यांना सहा किलोमीटर खासगी वाहनाने जाऊन बस पकडावी लागते. यात त्यांचा मोठा वेळ जात असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परंतु येथील बसस्थानकावर लांब पल्ल्यांच्या गाड्या यामध्ये अहमदनगर, पारनेर, शिरूर, औरंगाबाद, कल्याण, पाथर्डी, भिवंडी या आगाराच्या एसटी बस येथून दररोज ये-जा करत असतात. या सर्व बस राजुरीला थांबा असूनही थांबत नाही. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याबाबत तक्रारी देऊनही कुठलीच कारवाई होत नाही. येथे बस थांबाव्यात यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच ज्ञानेश्वर शेळके यांनी संबंधित परिवहन खाते तसेच आगारप्रमुखांना वारंवार दिले आहेत.
राजुरीला बस थांबेना
By admin | Published: October 12, 2016 2:22 AM