- कांताराम भवारी, डिंभे
पिढ्या मागून पिढ्या सरल्या, अनेकांची हयात पणाला लागली. कुणी जन्मल्या नंतर गेले, कुणी जन्मायच्या आधिच. दळणवळणाची सुविधाच नसल्याने मृत्युनंतरही अनेकदा डोंगराच्या पायथ्याशीच अंतिम कार्य उरकावे लागले. कित्येक माय बहीणींना त्यांच्या अडचणीच्या काळात दवाखान्याच्या सुविधा मिळाल्या नाहीत. आजा-याला झोळीचा तर बाळंतीणीला सुयिनीचा आधार. पाणी, विज,आरोग्य टंचाई तर यांच्या पाचविलाच पुजलेली जगण्यासाठी येथील आदिवासींना तर दररोजच झगडावे लागते. स्वातंत्र्यपुर्व काळापासून आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात उंच डोंगरावर वसलेले आपटी हे गांव मुलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहीले असून मुलभूत सुविधांची वाट पहाण्यात आजवर आपटी ग्रामस्थांच्या पिढ्यामागून पिढ्या पणाला लागल्या आहेत.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात डोंगर माथ्यावर वसलेले आपटी हे एक आदिवासी गांव, स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटली तरीही हे गांव मुलभूत सुविधांपासून वंचित राहीले आहे.गावातील पाण्याची गरज भागविण्यासाठी गावकऱ्यांनी दोन विहीरी बांधल्या आहेत. मात्र या जिर्ण विहीरींची वर्षानुवर्षे डागडूजीची कामे न झाल्याने कठडे तुटलेल्या या विहीरी धोकादायक झाल्या आहेत. विहीरीच्या दगडावर एक पाय आत व एक पाय बाहेर ठेवून येथील महीला पाणी ओढत असल्याचे भयान चित्र येथे पहावयास मिळाले. या विहीरी पैकी गावाच्या खालच्या बाजूला आसणा-या विहीरीचा वापर गावकरी वापरण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी करतात. सध्या या विहीरतील पाणी तळाला गेले असून ते पिवळे झाल्याने पावरण्यायोग्य राहीले नाही. गावाच्या उजव्या हाताला असणाऱ्या विहीरीवरच गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची भीस्त आहे. गावातील सुमारे ६० ते ७० कुटुंबांना याच विहीरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते.ना रस्ता ना पिण्याचे पाणी, आरोग्याच्या सुविधांची वाणवा, चौथी नंतरच्या शिक्षणासाठी गाव सोडून डोंगरावरून दररोज करावी लागणारी पायपीट तर दैनंदिन व्यवहारा बरोबरच, मोलमजूरी, दवापाणी, बाजारहाट व दुध विक्रीसाठी दररोज छताडावरील भला मोठा डोंगराची चढण-उतरण करण्याची वेळ आल्याने येथील आदिवासीनी निसर्गापुढे हार मानली आहे. अनेकदा बाळंत पणाच्या काळात मायबहीणींना झोळीत घालून रात्र अपरात्री डोंगर उतरावा लागतो. आजारी, जेष्ट नागरीकांचीही हीच त-हा. मात्र कोणतीही तक्रार न करता नशिबी आलेल जगायचं. अशीच येथील गावकऱ्यांच्या अंगवळणी पडल असून मुलभूत सुविधा अभावी आपटीकरांना पिढ्यान पिढ्यापासून खडतर जिवन कंठण्याची वेळ आली आहे. वारंवार मागण्या-निवेदने दिल्या नंतर अता कुठेतरी आपटीच्या रस्त्याला मंजूरी मिळाल्याचे समजते. गेल्या वर्षे भरापासून ही चर्चा आसल्याने आपटीकरांना अता रस्ता मिळेण्याची स्वप्न पडू लागली आहेत. परंतु अद्याप तरी या रस्त्याचे काम प्रत्येक्षात सुरू झाले नाही. मूलभूत सुविधा नसल्योन या गावात राहणारे गावकरी त्रस्त झाले असून निसर्गापुढे त्यांना हार मानन्याची वेळ आली आहे. दळणवळणासाठी कोणतीच सुविधा नसल्याने प्रशासणाच्या नजरेतूनही या गावाकडे दुर्लक्ष झाले आहे. रस्ताच नसल्याने आजही येथील गावकरी एक प्रकारे अज्ञात वासात रहात आहे. पिढ्या मागून पिढ्या सरल्या मात्र रस्तासाठी अजूनही येथील गावकऱ्यांना प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. गावाला जाण्यासाठी रस्ता तर नाहीच. त्या पाठोपाठ आपटीकरांना उन्हाळ्यामध्ये तिव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. दळणवळणाची कोणतीच सुविधा नसल्याने येथे टँकरने पाणी देणे शक्य नाही. पारंपरिक पाणीसाठे संपुष्ठात आले असून विहीरील झऱ्याचे पाणी टीपून आळीपाळीने हंडे भरण्याची वेळ येथील महीलांवर आली आहे. पाण्यासाठी आपटीकरांचा जिव कासाविस होत आहे. पाण्यासाठी येथील महीलांचा दिवस अन् रात्र खर्ची होत आहे. दररोज पाणी अणायचे तरी कोठून? पाण्यासाठी महीलांची झोप उडाली आहे.