पिंपरी : मोठा गाजावाजा करीत महापालिकेने ट्रिंग ट्रिंग डे (सायकल दिन) उपक्रमाची घोषणा केली. उद्योजक, स्वयंसेवी संस्थांनी या उपक्रमात सहभाग नोंदविण्याची तयारी दाखवली. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा अनोखा उपक्रम शहराच्या कोणत्या तरी एका भागात राबविण्याचे नियोजन होते. उपक्रमाची सुरुवात करण्यास ३० नोव्हेंबर दिवस निश्चित झाला. लांडेवाडी, भोसरी ते टाटा मोटर्स कंपनी या मार्गावर उपक्रमाचा प्रारंभ करण्याचे ठरले. कंपनीच्या बसगाड्या, मालवाहू वाहने, रिक्षा, टेम्पो अशा वाहनांची अत्यंत वर्दळ असलेल्या या रस्त्यावर रविवारी किमान दोन-तीन तास तरी सर्वत्र सायकली दिसून येतील, ही अपेक्षा होती. परंतु उद्घाटनावेळी केवळ दहा मिनिटांसाठी विद्यार्थ्यांच्या सायकली धावल्या. ट्रिंग ट्रिंग डे उपक्रमाची नुसती घंटी वाजली अन् उपक्रम लगेच गुंडाळण्यातही आला.ट्रिंग ट्रिंग डेबद्दल नागरिकांच्या डोळ्यापुढे विविध संकल्पना साकारल्या होत्या. या उपक्रमाअंतर्गत रस्त्यावर केवळ सायकलस्वार, योगासने करणाऱ्या व्यक्ती, खेळणारे, धावणारे लोक असे चित्र डोळ्यांपुढे राहिले होते. प्रत्यक्ष त्या दिवशी मात्र वेगळचे चित्र पहावयास मिळाले. सायकली धावल्या; पण उद्घाटन कार्यक्रम झाल्यावर. आयुक्त राजीव जाधव आले, त्यांनी डोक्यात हेल्मेट घालून स्कूटरवरून रपेट मारली. पक्षनेत्या मंगला कदम यासुद्धा दुचाकीवर स्वार झाल्या. पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने ट्रिंग ट्रिंग डे राबविला. पण आयुक्त जाधव यांनी मोेटार सायकलवर रपेट मारून हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. स्वयंसेवी संस्था, उद्योजक यांनी सक्रिय सहभाग घेऊनही महापालिकेला सायकल डे उप्रकम यशस्वीपणे राबवता आला नाही. उपक्रमाची सुरूवातच अशी झाल्याने, पुढच्या टप्प्यात उपक्रमाचा बोजवारा उडण्याचे संकेत मिळाले आहेत.
‘ट्रिंग ट्रिंग डे’ची नुसतीच वाजली घंटी
By admin | Published: December 03, 2014 3:06 AM