विवेक भुसे, पुणे पुणे : लोकसभा, विधानसभा आणि आता महापालिका निवडणुकीत जनतेने भाजपाला भरभरून मतदान केले़ २५ वर्षे शिवसेनेबरोबर युती असल्याने कार्यकर्त्यांना संधी मिळत नव्हती़ भाजपाने यंदा स्वतंत्रपणे निवडणूक लढविताना तळागाळात काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या घरात आरक्षित जागेवर उमेदवारी दिली़ भाजपाच्या लाटेमुळे या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला़ त्यातून त्यांना आपले कार्य विस्तारण्यास संधी मिळाली आहे़ प्रभाग ७, १४ आणि १६ मधून ९ भाजपा, १ शिवसेना आणि २ काँग्रेस उमेदवार विजयी झाले़ सर्वांत धक्कादायक निकाल ठरला तो, काँग्रेस पुरस्कृत रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे गटनेते गणेश बीडकर यांच्यावर मिळविलेला विजय होय़ प्रभाग क्रमांक १६ कसबा पेठ, सोमवार पेठ या प्रभागात रवींद्र धंगेकर यांच्या जुन्या प्रभागाचा काहीच भाग आलेला होता़ शहरात सर्वत्र भाजपाची लाट असताना तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांचा मतदारसंघ असलेल्या कसबा पेठेत धंगेकर यांनी कामाच्या जोरावर हा विजयश्री खेचून आणला़ सामान्यांना हक्काचा माणूस म्हणून आपण वाटत असल्याचे या विजयाने दाखवून दिले़ या प्रभागात रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीमुळेच मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाल्याचे दिसून येत आहे़ काँग्रेसच्या सुजाता शेट्टी यांनी भाजपाच्या वैशाली सोनवणे यांचा केवळ १२९ मतांनी पराभव केला़ तर, शिवसेनेच्या पल्लवी जावळे यांनी भाजपा पुरस्कृत छाया वारभूवन यांच्यावर २ हजार ७६९ मतांनी विजय मिळविला़ अशी भाजपाच्या मतांमध्ये फाटाफूट होत असतानाच याच प्रभागात भाजपाचे योगेश समेळ यांनी काँग्रेसचे नितीन परतानी यांच्यावर तब्बल ५ हजार ५६३ मतांनी विजय मिळविला़ या प्रभागात क्रॉस व्होटिंग झाल्याचे दिसून येते़ प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजपा पुरस्कृत रेश्मा भोसले यांचा विजय महत्त्वाचा मानला जातो़ राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट नाकारल्यावर त्यांनी भाजपाचे तिकीट मिळविले़ पण, आॅनलाईनवरील फॉर्ममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव असल्याने त्यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला गेला़ त्याविरुद्ध उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली गेली़ त्यामुळे रेश्मा भोसले यांच्याविषयी नकारात्मक बातम्या मोठ्या प्रमाणावर आल्या़ तरीही त्या भाजपाच्या पुरस्कृत उमेदवार आहेत याची माहिती मतदारांपर्यंत विनासायास पोहोचली़ त्याचवेळी प्रचारात त्या अपक्ष असल्या तरी त्यांनी भाजपाच्या अन्य तीनही उमेदवारांना बरोबर घेऊन शेवटपर्यंत प्रचार केला़ त्याचा त्यांना फायदा होऊन भाजपाची पारंपरिक मते त्यांच्या पारड्यात पडली़
लाटेमुळे कार्यकर्त्यांना न्याय
By admin | Published: February 25, 2017 2:44 AM