लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशातील १९ महानगरांमध्ये अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यातील सहभागामध्ये २०१७ मध्ये पुणे शहर तिसऱ्या क्रमांकावर होते. गेल्या दोन वर्षात अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यातील सहभाग कमी झाला असून, २०१९ मध्ये पुणे शहराचा क्रमांक ७ पर्यंत खाली आहे. पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी केलेल्या कार्याचे प्रत्यक्ष परिणाम दिसून येत आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या २०१९ च्या अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यातील माहितीवरुन हे स्पष्ट होत आहे. देशातील १९ महानगरातील गुन्हेगारीविषयक माहिती या अहवालात दिली आहे. त्यानुसार २०१७ मध्ये पुण्यात ७१५ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांमध्ये सहभाग दिसून आला होता. २०१८ मध्ये ही संख्या ४८३ पर्यंत कमी झाली होती. २०१९ मध्ये २९९ अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत सहभाग आढळून आला आहे. अल्पवयात गुन्हेगारीत ओढली गेलेली मुले पुढे अट्टल गुन्हेगार बनल्याची उदाहरणे आहेत. पुणे पोलिसांनी भरोसा सेलच्या माध्यमातून बाल कल्याण विभाग सुरु केला. त्यात गुन्हेगारीत ओढल्या गेलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुरु केले. मुलांना समुपदेशन करण्यासाठी पुण्यात लष्कर पोलीस ठाण्यात नुकताच स्वतंत्र कक्ष सुरु केला आहे.
देशभरातील प्रमुख १९ महानगरांमध्ये पुणे शहराचा क्रमांक १३ वा आहे. सर्व प्रकारच्या आयपीसी गुन्ह्यांमध्ये पुणे देशात १३ वे असून राज्यात मुंबई खालोखाल पुण्याचा क्रमांक लागतो. खुनासारख्या गुन्ह्यात प्रति लाख लोकसंख्येच्या प्रमाणात पुणे शहर १.५ टक्के इतका आहे. खुनाच्या प्रकारात नागपूर, मुंबई पाठोपाठ पुण्याचा क्रमांक लागतो.
गुन्हे देशात पुण्याचा क्रमांक्र
सर्व आयपीसी गुन्हे १३
खुन १०
महिलांविरुद्धचे गुन्हे ९
मुलांविरुद्धचे गुन्हे ४
हिंसात्मक गुन्हे ५
अपहरण ५,
बलात्कार ७,
चोरी ९
...........
गुन्हेगारी कृत्यापासून अल्पवयीन मुलांना राेखण्यासाठी पोलीस सातत्याने प्रत्यत्न करीत आहोत. तसेच गुन्हेगारीत ओढल्या गेल्याला मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पुणे पोलीस कार्यरत आहेत.
अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे