इंदापूर (पुणे) : 'अतिथि देवो भव' ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या सर्वांचे स्वागत आहे. बारामतीतही कोणी येत असतील तर आनंदच आहे. त्यांचे मनापासून स्वागत करु. त्यांना बारामतीतील विकास पहायचा असेल तर तसे नियोजनही करू. शेवटी आम्ही लोकशाहीवाले लोक आहोत,असे वक्तव्य आज (दि.२४ ) खा.सुप्रिया सुळे यांनी भरणेवाडी येथे पत्रकारांशी बोलताना केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्यांचा आपल्या वा आपल्या पक्षावर फारसा परिणाम झाला नसल्याचे त्यांनी दाखवून दिले.
पाटना येथील विरोधी पक्षाच्या बैठकीत उध्दव ठाकरे, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसल्याच्या कारणावरुन भाजपने ठाकरे यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. ही बैठक फोटोसेशन बैठक आहे. या शब्दांत टीका केली जात आहे, या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, भाजपला आत्ता बोलायला काहीच राहिले नाही. त्या त्यांच्या बाजूला बसल्या त्यावेळी चालत होते आणि आत्ता काय होते आहे. शेजारी बसणे हा काही गुन्हा आहे का असा सवालही त्यांनी केला. आम्ही लोकशाहीवाले आहोत दडपशाहीवाले नाही. दिलदार आहोत. विरोधकांनीही टीका दिलदारपणे करावी.
जो विरोधात बोलतो त्याच्यावरच केस होते. आत्तापर्यंत राज्यात व देशभरात जे गुन्हे दाखल झाले. त्यातील ९५ टक्के गुन्हे विरोधी पक्षातील लोकांवरच झाले आहेत. कार्यकर्त्यांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट दिसते आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या.
"दुध दराविषयी आमची भूमिका स्पष्ट..."
पुढे खा. सुळे म्हणाल्या, दुध दराविषयी आमची भूमिका स्पष्ट आहे. भाजप सरकारने परदेशातून दुध आणा असा आदेश काढला होता. त्यास सर्वप्रथम शरद पवार यांनी विरोध केला. त्यांनी पत्र दिल्यानंतर सरकारने तो आदेश रद्द केला. दुध दराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शेतक-यांच्या बाजूने आहे. शेतीमालाला हमीभावात मिळावा ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका कायम आहे.
"आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा सर्वांना वाटते..."
पुढच्या वर्षीची पंढरपूरची विठ्ठलपुजा अजित पवारांच्या हस्ते होईल असे वक्तव्य आ. अमोल मिटकरी यांनी काल इंदापूरात केले होते. त्या विषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा असे प्रत्येकाला वाटत असते त्यात चूक काय आहे, असे खा. सुळे म्हणाल्या. वीरश्री मालोजीराजे यांच्या गढीवरील पाडलेल्या चिंचेच्या झाडाच्या प्रकरणाची चौकशी होऊन कारवाई व्हावी असे मत त्यांनी व्यक्त केले.