पुणे : गाजावाजा करत राज्यात प्रवेश झालेल्या तेलंगणा येथील भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मध्ये विलिनीकरण होणार असल्याची चर्चा आहे. या पक्षाच्या महाराष्ट्रातील काही नेत्यांनी पवार यांची पुण्यात भेट घेतली असल्याचे समजते. ६ सप्टेंबरला पवार यांच्याच उपस्थितीत राज्यातील या पक्षाचे नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील.
या पक्षाचे तेलंगणामधील संस्थापक अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात प्रवेश करून पक्षाला राष्ट्रीय करण्याची तयारी सुरू केली होती. पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी तब्बल ६०० गाड्यांचा ताफा घेऊन महाराष्ट्रात आलेल्या त्यांची चर्चा झाली होती. मात्र, तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाचा काँग्रेसकडून सपशेल पराभव झाला. त्यामुळे त्यांची तेथील हवा गेली. त्यानंतर राज्यातील त्यांच्या पक्षाची चर्चाही बंद झाली.
पंढरपूर येथील काही नेते त्यांच्या पक्षात गेले होते. राज्यात पक्षाचे संघटन वाढावे, यासाठी त्यांनी काही पावलेही उचलली होती. तेच नेते मंगळवारी दुपारी शरद पवार यांना पुण्यात भेटून गेल्याचे समजते. त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांसह पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची तयारी दर्शवली आहे. पवार यांना त्यांनी सहकाऱ्यांबरोबर चर्चा करून भूमिका ठरवू, असे सांगितले असल्याची माहिती समजली.