लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात २१ ते २३ जुलैदरम्यान पुणे कबड्डी लीगचा थरार रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य आॅलंपिक संघटनेचे तसेच पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी संघटनेच्या मान्यतेने बाणेर-बालेवाडी-पाषाण प्रभाग क्रमांक ९ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष व सतेज संघ बाणेर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॉक्सिंग हॉलमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. मॅटवर होणारी ही स्पर्धा पुरूष तसेच महिला गटात होत आहे. या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा कबड्डी संघटनेला संलग्न असणाऱ्या संस्थांमधील पुरूष व महिला खेळाडूंची निवड चाचणी श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात २ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत होईल. यासाठी आत्माराम कदम, दत्तात्रय कळमकर, किरण चांदेरे हे निवड समिती सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. तर नियंत्रक म्हणून पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष आमदार महेश लांडगे, कार्याध्यक्ष मधुकर नलावडे, सहकार्यवाह संदेश जाधव, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, शकुंतला खटावकर, सुमती पुजारी व किशोरी शिंदे यांची समिती असणार आहे. या चाचणीस उपस्थित राहणाऱ्या खेळाडूंचाच या स्पधेर्साठी विचार केला जाणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंचा बलाढ्य बारामती, पिंपरी चिंचवड, झुंजार खेड व वेगवान पुणे अशा ४ संघांत समावेश करण्यात येईल.
पुण्यात रंगणार कबड्डी लीगचा थरार
By admin | Published: June 28, 2017 4:24 AM