लोकमत न्यूज नेटवर्कमगरपट्टा : माळवाडी रोड अमरधाम स्मशानभूमीसमोरील हडपसर पोलीस स्टेशनच्या नवीन नियोजित इमारतीसाठी राखीव जागेचा वापर महानगरपालिकेच्या कचराकुंडीसाठी केला जात आहे. हडपसर पोलीस ठाण्याची हद्द मांजरी, मंतरवाडी फाटा ते कात्रज बायपासपर्यंत वाढल्याने पोलिसांना कामकाज करण्यासाठी हडपसर गाडीतळ येथील पोलीस ठाण्याची जागा अपुरी पडत आहे. तसेच उच्च न्यायालयाने २00८ साली उड्डाणपुलाखालच्या जागा तातडीने खाली करण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणून २0१३ साली ३0 गुंठे जागेत नवीन पोलीस ठाण्याची इमारत उभारण्यास शासनाने गायरानाची जागा दिली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्या वेळी भूमिपूजनही झाले होते.परंतु त्या जागेत एका कडेला अनेक वर्षे लाकडाची वखार सुरू आहे. या वखारचालकाने ही पोलीस ठाण्याची नियोजित जागा त्याला व्यवसाय करण्यास मिळावी, असा न्यायालयात दावा दाखल केला असून, सदर दाव्यात न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या काळात ह्या मोकळ्या जागेचा वापर वाळू, खडी व क्रशसँड विक्रेत्यांनी अनेक वर्षांपासून मालाचा साठा व विक्रीसाठी केला आहे.बेकायदेशीर अतिक्रमण केलेल्या वाळू, खडी व क्रशसँड विक्रेत्यांवर पोलीसदेखील कार्यवाही का करीत नाही, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. सदर विक्रेत्यांवर वेळीच कारवाई न केल्यास हे विक्रेतेदेखील उद्या बिल्डिंग मटेरियल सप्लायसाठी ह्या जागेची मागणी अथवा दावा करू शकतील. एका प्रकारे पोलीस ठाण्याची जागाच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीची जागा त्वरित न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.दारूच्या बाटल्या आणि राडारोडारात्रीच्या वेळी दारू पिणारे येथे आपली वाहने उभी करून दारू पिल्यानंतर तिथे बाटल्या टाकून जातात. बांधकामाचा टाकाऊ राडारोडा रात्रीचा या जागेत टाकला जातो. आता महानगरपालिकेने या जागेत कचराकुंड्या ठेवल्या आहेत. पोलीस ठाण्याच्या नियोजित जागेची कचराकुंडी व विविध अतिक्रमणे झाली आहेत.
पोलीस ठाण्याच्या जागेत कचराकुंडी
By admin | Published: July 06, 2017 3:30 AM